‘वसंतदादा’च्या ४६ गुंठे जागेची पाच कोटीस विक्री-सांगलीतील स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेडकडून खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:57 PM2018-03-31T23:57:08+5:302018-03-31T23:57:08+5:30
मिरज : १२ कोटी २० लाख रुपये विक्री कराच्या थकबाकी वसुलीसाठी वसंतदादा साखर कारखान्याच्या माधवनगर रस्त्यावरील ४६.१८ गुंठे या मालमत्तेचा ४ कोटी ८६ लाखास लिलाव करण्यात आला. ही मालमत्ता सांगलीतील स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड या कंपनीने घेतल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २१ कर्मचाऱ्यांच्या सुमारे ८८ लाख रुपये भविष्य निर्वाह निधी रक्कम वसुलीसाठी गट क्रमांक २३१/१ (क्षेत्र ८.५ गुंठे) व विक्री कराची थकीत रक्कम १२ कोटी २० लाख रूपये वसुलीसाठी सर्व्हे क्रमांक २३१/२ व (क्षेत्र ४६.१८ गुंठे) या मालमत्तेचा संयुक्त लिलाव जाहीर करण्यात आला होता.
सर्व्हे क्रमांक २३१/२ व मधील ४६.१८ गुंठे मालमत्ता लिलावासाठी चारजणांनी सहभाग घेतला होता. ४६.१८ गुंठे मालमत्ता लिलावासाठी ४ कोटी ८४ लाख ८९ हजार इतकी रक्कम निश्चित करण्यत आली होती. स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड सांगली या कंपनीने ही जागा ४ कोटी ८६ लाखास घेतली. कागदपत्रांच्या पूर्तता व लिलावाची रक्कम भरल्यानंतर या मालमत्तेचा कंपनीकडे ताबा देण्यात येणार आहे.
कामगारांच्या थकबाकीची अन्य लिलावात अडचण
कारखान्याच्या २१ कर्मचाºयांच्या भविष्यनिर्वाह निधी सुमारे ८८ लाखांच्या थकबाकी वसुलीसाठी सर्व्हे क्रमांक २३१/१ या मालमत्तेच्या लिलावात कोणीही सहभाग घेतला नाही. त्यामुळे या जागेचा लिलाव होऊ शकला नाही. कारखान्याने २१ कर्मचाºयांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याकडून देण्यात आली होती. मात्र सर्व कर्मचाºयांची रक्कम अद्याप देण्यात आलेली नसल्याने थकबाकी वसुलीसाठी व विक्री कराच्या उर्वरीत थकबाकी वसुलीसाठी कारखान्याच्या आणखी काही मालमत्तेचा लिलाव घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार शरद पाटील यांनी सांगितले.