‘सिव्हिल’मध्ये मोफत औषधांची पैसे घेऊन विक्री
By admin | Published: July 19, 2014 11:09 PM2014-07-19T23:09:48+5:302014-07-19T23:24:00+5:30
रुग्णांची लूट : सांगली, मिरजेतील प्रकार, शासकीय रुग्णालयातच थाटले दुकान
सचिन लाड, सांगली : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णांना मोफत मिळणाऱ्या औषधांची सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात पैसे घेऊन विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. गोरगरीब रुग्णांसाठी असलेल्या या योजनेचा कोणताही लाभ न देता लुटीचा उद्योग सुरू आहे. यासाठी सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयांत बाहेरच्या व्यक्तींनी कोणताही परवाना न घेता औषधांची दुकाने थाटली आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत गरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार केले जातात. मिरजेतील रुग्णालयात अधिष्ठातांच्या कार्यालयाजवळील एका खोलीत या योजनेच्या औषधांचा साठा करण्यात आला आहे. खोलीबाहेर ‘दीप मेडिकल’ असे लिहिले आहे. योजनेंतर्गत रुग्णांना एकाही प्रकारचे औषध मोफत दिले जात नाही. त्यांना रुग्णालयातील ‘दीप मेडिकल’मधून औषधे खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. रुग्णांना याची कोणतीही कल्पना नसल्याने तेही पैसे देऊन औषधे खरेदी करीत आहेत. रुग्णांना औषध खरेदीची पावती दिली जात असली, तरी त्यावर ‘दीप मेडिकल’चा कोणताही पत्ता नमूद नाही. केवळ मोबाईल क्रमांक व औषध परवाना क्रमांकाचा उल्लेख आहे. हे औषध दुकान चालविणाऱ्या व्यक्तीचा रुग्णालय व योजनेशी काही संबंध नाही. मग त्याला येथे दुकान काढण्यास परवानगी कोणी दिली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीतील रुग्णालयात खोली क्रमांक ३१ मध्ये योजनेच्या औषधांचा साठा करून रुग्णांना पुरवठा केला जात आहे. औषधे विकणाऱ्या या व्यक्तीनेही औषधांचा साठा करून त्यांची विक्री करण्याचा परवाना घेतला नसल्याचे समजते. ही व्यक्ती पैसे घेत नाही. योजनेच्या औषधांचे पैसे शासनाने निधी मंजूर केल्यानंतर देणार असल्याचा व्यवहार रुग्णालय प्रशासनाशी झाला आहे. या बदल्यात त्याने मात्र योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांशिवाय अन्य आजारांवरील औषधांचीही विक्री सुरू केली आहे. रुग्णांनाही तेथून औषधे घेण्याचा सल्ला दिला जात आहे. या बदल्यात तो औषध खरेदीची पावतीही देत नाही. त्याच्याकडून मुदत संपलेल्या औषधांची विक्री केली जाऊ शकते. रुग्णांंच्या जीविताशी खेळ सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने मात्र गांधारीची भूमिका घेतली आहे. गरिबांचा आधार गेला शासनाकडून मोफत औषधांचा पुरवठा करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. या ठेकेदाराने रुग्णालयास औषधांचा पुरवठा केल्यानंतर त्याला शासन बिल अदा करणार आहे. असे असताना रुग्णांना मोफत देण्यात येणाऱ्या औषधांची विक्री केली जात आहे. पुन्हा याच औषधाचे शासनाकडूही पैसे घेतले जात आहेत. यावरून ठेकेदारांची दुप्पट कमाई सुरू असल्याचे दिसून येते. यामध्ये रुग्णालय प्रशासनाचा हात असल्याची चर्चा आहे. यामुळेच त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचे चित्र आहे.