खारी, टोस्ट, सॅंडविच ब्रेड, केकचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 12:36 PM2021-03-27T12:36:33+5:302021-03-27T12:44:37+5:30
food Sangli-खाद्यतेल, डिझेल आणि कच्च्या मालाच्या दरवाढीने बेकरीचे पदार्थही महागले आहेत. बेकरी व्यावसायिक संघटनेने उत्पादनाच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली : खाद्यतेल, डिझेल आणि कच्च्या मालाच्या दरवाढीने बेकरीचे पदार्थही महागले आहेत. बेकरी व्यावसायिक संघटनेने उत्पादनाच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
खारी, टोस्ट, पाव, सँडविच ब्रेड, बिस्कीटे ही मोठ्या खपाची उत्पादने किलोमागे सरसकट २० ते ३० रुपयांनी महागणार आहेत. सांगली, मिरज, कुपवाड बेकरी असोसिएशनच्या मंगळवारी (दि. २३) झालेल्या बैठकीत दरवाढीचा निर्णय झाला. खजिनदार नाविद मुजावर म्हणाले की, खाद्यतेल आणि डिझेलच्या दरवाढीचा बोजा आवाक्याबाहेर गेल्याने दरवाढ करावी लागत आहे.
सर्वच कच्च्या साहित्याची ५० ते ७० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. तेल, वनस्पती तूप, डिझेल, पॅकिंग साहित्य महागल्याने सध्याच्या दरात उत्पादने देणे शक्य नाही. त्यामुळे २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ लागू केली आहे. यावेळी प्रवीण पाटील, कृष्णराव माने, फिरोज केपी, असिफ भोकरे, संजू नायर आदी बेकरी व मिठाई उत्पादक उपस्थित होते. बेकरीसाठी सध्या डिझेल किंवा विद्युत भट्ट्यांचा वापर होतो. डिझेल नव्वदीपर्यंत पोहचल्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
वनस्पती तूप २००० रुपयांवर
काही वस्तुंची दरवाढ अशी : वनस्पती तूप १५ किलोचा डबा १४०० रुपयांवरुन २००० रुपये. डिझेल ६८ रुपये लिटरवरुन ८९ रुपये. पामतेलाचा १५ किलोंचा डबा १०३० रुपयांवरुन २००० ते २१०० रुपये. सरकी तेल १५ किलोचा डबा २३०० रुपये. पॅकिंगचे प्लास्टीक १६० रुपये किलोवरुन २५० रुपये किलोवर. महागाईने उत्पादन खर्चात ५० ते ७० टक्के दरवाढ झाली आहे.
खारी २२० रुपये तर ब्रेड २५ रुपये
नव्या दरवाढीनुसार १८० रुपयांच्या एक किलो खारीसाठी आता २१० ते २२० रुपये मोजावे लागतील. २०० ग्रामचा सँडविच ब्रेड २० रुपयांवरुन २३ ते २५ रुपयांवर जाईल. टोस्ट १४० रुपये किलोप्रमाणे मिळायचे, आता १६० ते १८० रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय केक, बर्गर पाव, बिस्कीटे, नानकटाई, शेव यांचे दरही किलोमागे २० ते २५ रुपये वाढणार आहेत.