नागनाथअण्णांच्या आवाजानेच शेतकऱ्यांचा उद्धार
By Admin | Published: July 15, 2014 11:58 PM2014-07-15T23:58:36+5:302014-07-16T00:00:14+5:30
राज बब्बर : वाळव्यात क्रांतिवीरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; मान्यवरांकडून आदरांजली
वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांचा आवाज जिवंत ठेवायचा असेल, तर त्यांच्या विचार व तत्त्वाने त्यांचे कार्य पुढे अखंड सुरू ठेवले पाहिजे. अण्णांचा आवाज सदैव जिवंत ठेवल्यास हुतात्मा संकुलाच्या माध्यमातून सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचा उध्दार होईल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, ज्येष्ठ सिनेअभिनेते व माजी खासदार राज बब्बर यांनी आज (मंगळवारी) येथे केले.
क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज बब्बर बोलत होते. राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी समारंभाचे निमंत्रक वैभव नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, कुसूमताई नायकवडी, सौ. सरोजमाई पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, अॅड. सुभाष पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, सरपंच गौरव नायकवडी, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज बब्बर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अण्णांनी उपेक्षित, पीडित, वंचित, दीनदलित, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. परिवर्तनवादी विचारधारेमुळे ते सत्तेमध्ये आले नाहीत.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, सहकार चळवळ शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची आहे. ती जिवंत ठेवण्याचे काम यापुढे करायला हवे. जाती-धर्माच्या, विविध पंथांच्या व अंधश्रध्देच्या नावाखाली चालू असलेले राजकारण थांबवून समाजाच्या हिताचे, प्रगतीचे राजकारण करणे हीच अण्णांना आदरांजली ठरेल.
प्रा. डॉ. बाबूराव गुरव, कुसूमताई नायकवडी, प्रा. बाळासाहेब नायकवडी, सौ. सरोजमाई पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. वैभव नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, टेंभू योजनेतून दुष्काळग्रस्तांना पाणी मिळण्यासाठी अण्णांनी सतत २० वर्षे संघर्ष केला.
यावेळी किरण नायकवडी, सरपंच गौरव नायकवडी, भगवान पाटील, बाळासाहेब पाटील, गंगाराम सूर्यवंशी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, महादेव कांबळे, भगवान अडिसरे, नामदेव गावडे, अरुण यादव, शंकर खोत, बी. आर. थोरात, आनंदा पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, दूध संघाचे कार्यकारी संचालक एन. एम. मंडलिक व नागरिक उपस्थित होते. प्रा. राजा माळगी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)