सांगली जिल्ह्यातील बदल्यांमध्ये समानीकरणाचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:30 PM2018-05-29T23:30:19+5:302018-05-29T23:30:19+5:30
जिल्ह्यातील २१६५ शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करताना सर्व तालुक्यात समान रिक्त पदे ठेवण्यासह अतिरिक्त शिक्षकांच्या शाळेचाही विचार केला गेलेला नाही
सांगली : जिल्ह्यातील २१६५ शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करताना सर्व तालुक्यात समान रिक्त पदे ठेवण्यासह अतिरिक्त शिक्षकांच्या शाळेचाही विचार केला गेलेला नाही. ग्रामविकास विभागाने केलेल्या या बदल्यांमुळे समानीकरणाच्या ७४४ रिक्त पदांचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे शिक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारीही मंगळवारी गोंधळून गेले. जत, आटपाडी, खानापूर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे.
जिल्ह्यात १६९८ प्राथमिक शाळा असून ६४३१ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी ५८०६ शिक्षक कार्यरत आहेत. ७६० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. एकूण रिक्त जागांपैकी सर्वाधिक ३५० शिक्षकांच्या जागा जत तालुक्यात रिक्त आहेत. आटपाडी, खानापूर तालुक्यातही रिक्त शिक्षकांच्या पदांची संख्या जास्त आहे. दुर्गम, दुष्काळी तालुक्यातील शिक्षकांची पदे वर्षानुवर्षे रिक्त राहत असल्यामुळे सर्व तालुक्यांत समान पदे रिक्त ठेवण्याचा ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला होता.
त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेकडून सर्व तालुक्यांत समान जागा रिक्त ठेवण्यासाठीच्या शाळांची नावे मागविली होती. त्यानुसार सर्वच जिल्हा परिषदांनी ती यादी ग्रामविकास विभागाच्या आॅनलाईन कक्षाकडे दिली होती. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या बदल्यांमुळे समानीकरणातील रिक्त ठेवण्यात येणाऱ्या शाळा ब्लॉक झाल्या होत्या. तेथील जिल्हा परिषदांच्या बदल्यांमध्ये फारसा गोंधळ निर्माण झाला नाही.
सांगली जिल्हा परिषदेकडील बदल्यांमध्ये मात्र संवर्ग एक ते चारच्या सर्व बदल्या एकाचवेळी करण्यात आल्या. या आॅनलाईन बदल्या करताना दहा तालुक्यात समानीकरणाने ६४३ शाळांतील ७४४ शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक होते. या शाळांतील पदे ब्लॉक होणे अपेक्षित होते. या शाळा प्रत्यक्षात ब्लॉक झाल्याच नाहीत. यामुळे सर्व तालुक्यात शिक्षकांची समान पदे रिक्त ठेवण्याचा फज्जा उडाला. रिक्त ठेवायच्या शाळेतही ग्रामविकास विभागाकडून शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, मिरज तालुक्यातील काही शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले असून तेथेही बदलीने शिक्षक नियुक्त केले आहेत. तेथे नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांमुळे अतिरिक्त शिक्षक जाणार असून, उर्वरित दुसºया शिक्षकाचीही तेथून बदली होणार आहे.
ग्रामविकास विभागाच्या या सावळ्या गोंधळामुळे शिक्षकांसह जिल्हा परिषद प्रशासनाचीही पंचाईत झाली आहे. मंगळवारी शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांची भेट घेऊन बदल्यांच्या गोंधळाबाबत विचारणा केली. वाघमोडेही गोंधळाबद्दल शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत.
जत तालुक्यात समानीकरणामुळे १७८ पदे रिक्त असण्याची गरज होती. परंतु, सध्या २४१ पदे रिक्त आहेत. आटपाडी, खानापूर तालुक्यातही तशीच परिस्थिती आहे. उर्वरित तालुक्यात मात्र समानीकरणाने सक्तीने रिक्त ठेवायच्या पदांपेक्षाही कमी रिक्त पदे आहेत. यामुळे येथील शिक्षकांना सक्तीने विस्थापित व्हावे लागणार होते. पण, आॅनलाईन प्रक्रियेत सक्तीने रिक्त ठेवायच्या शाळा ब्लॉक न झाल्यामुळे तेथे शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
ज्येष्ठांची गैरसोय
जत, आटपाडी, खानापूर या दुष्काळी भागामध्ये दहा ते पंधरा वर्षे सेवा करुन काही ज्येष्ठ शिक्षक तालुक्यात नियुक्त झाले आहेत. कनिष्ठ शिक्षकांची सोय करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षकांच्या शाळेत त्यांची नियुक्ती केली आहे. कनिष्ठांच्या ‘खो’मुळे ज्येष्ठ शिक्षकांवर पुन्हा विस्थापित होण्याची वेळ आली आहे. काही शिक्षकांनी बदलीची मागणी करुनही त्यांना सोयीच्या शाळा दिल्या नाहीत.
शिक्षकांची रिक्त पदे
तालुका सध्या समानीकरणाने
रिक्त रिक्त ठेवण्याची
पदे
आटपाडी ८८ ६०
जत २४१ १७८
क़महांकाळ ४१ ५४
खानापूर ५९ ४४
मिरज ९४ ११७
पलूस १४ ३२
शिराळा ३४ ४५
तासगाव ७९ ८३
वाळवा ६० ९३
कडेगाव ५० ३८
एकूण ७६० ७४४
सर्व तालुक्यात समान शिक्षकांची पदे रिक्त ठेवायची होती, तर ती ब्लॉक का केली नाहीत? प्रशासनाच्या गोंधळामुळे अनेक शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ निर्माण झाला आहे. अतिरिक्त ठरलेल्या शाळेतही शिक्षक दिले आहेत. अनेक ज्येष्ठ शिक्षकांना कारण नसताना विस्थापित व्हावे लागत आहे. हे चुकीचे असून यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. अन्यथा आंदोलन छेडावे लागेल.
- बाबासाहेब लाड,
जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती