सांगलीतील कुपवाडमध्ये 'ते' सांबर अखेर सहा दिवसानंतर सापडले, मोहिमेसाठी राबवली 'बोमा पद्धत'; नेमकी काय?
By श्रीनिवास नागे | Published: December 7, 2022 01:08 PM2022-12-07T13:08:04+5:302022-12-07T18:44:26+5:30
या मोहिमेमध्ये वन विभागाकडून सांबरास कोणतीही इजा होऊ दिली नाही, मात्र, दोन वनमजूर किरकोळ जखमी झाले
सांगली : कुपवाड शहरातील वसंतदादा सूतगिरणी परिसरात सलग सहा दिवस मुक्काम ठोकून बसलेल्या सांबरास बुधवारी पहाटे वन विभागाकडून ताब्यात घेण्यात आले. वन विभागाकडून ही मोहीम बोमा पद्धत वापरून सलग १२० तास अथक प्रयत्न करून यशस्वी करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आल्यानंतर सांबर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वन विभागाकडून संबंधित सांबरास चांदोली अभयारण्याच्या अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
मिरज एमआयडीसीतील गोदरेज कारखान्याच्या परिसरात दोन डिसेंबर रोजी नागरिकांना सांबर दिसून आले होते. त्यानंतर वन विभागाकडून हे सांबर पकडण्यासाठी व त्याला वन अधिवासात सोडून देण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. उपवनसंरक्षक नीता कट्टी, सहायक वनसंरक्षक डॉक्टर अजित साजने, वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाटील, महंतेश बंगले, वन्यजीव रक्षक अजित ऊर्फ पापा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोमा पद्धतीचा वापर करून सलग १२० तासाच्या अथक प्रयत्नानंतर सांबरास ताब्यात घेण्यात आले.
या मोहिमेमध्ये वन विभागाकडून सांबरास कोणतीही इजा होऊ दिली नाही. त्याला वनविभागाकडून पकडण्यात आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद ढगे यांनी सांबराची तपासणी केली. ते सुस्थितीत व वन अधिवासात सोडण्यास योग्य असल्याचे डॉ. ढगे यांनी सांगितले. त्याला चांदोली अभयारण्याच्या अधिवासात सोडून देण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
या मोहिमेदरम्यान सांबर पकडण्यासाठी आलेले दोन वनमजूर किरकोळ स्वरूपात जखमी झाले. या मोहिमेसाठी सामाजिक संघटनांनी मोलाची मदत केली असे वन विभागाकडून सांगण्यात आले.
काय आहे ही बोमा पद्धत....
वन्यप्राणी पकडण्यासाठी राबवली जाणारी बोमा पद्धत ही आफ्रिका या देशांमध्ये फार लोकप्रिय आहे. या पद्धतीचा वापर भारत देशामध्ये ही केला जातो. हरीण, सांबर या वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी ही पद्धत प्रामुख्याने वापरली जाते. या पद्धतीमुळे वन्य प्राण्यास कोणतीही इजा होत नाही. या पद्धतीमध्ये वन्यप्राण्याला गोंधळात टाकून त्याला वन पिंजऱ्यात पकडले जाते. त्याची वैद्यकीय तपासणी करून वन अधिवासात सोडले जाते.