संभाजी भिडेंकडून फडणवीसांना 'राम कथे'साठी निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:37 PM2022-11-04T12:37:45+5:302022-11-04T12:38:20+5:30
या सोहळ्यास अयोध्येच्या राम मंदिर निर्माण न्यासचे कोषाध्यक्ष प. पू. गोविंद गिरी महाराज उर्फ आचार्य किशोर व्यासही उपस्थित राहणार आहेत.
सांगली : रामकथा व नामसंकीर्तन सोहळा समितीच्यावतीने येत्या जानेवारीमध्ये सांगलीत होणाऱ्या राम कथा सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी निमंत्रण दिले.
भिडे यांच्यासह सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरलाल सारडा, सांगलीचे माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई उपस्थित होते. मुंबईत मंत्रालयात त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भिडे यांनी सांगलीत होणाऱ्या राम कथेच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यासह विविध विषयांवर भिडे व सारडा यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
सांगलीत ४ जानेवारी ते १४ जानेवारी २०२३ मध्ये राम कथा व नामसंकीर्तन सोहळा होणार आहे. दररोज दुपारी प. पू. समाधान महाराज शर्मा यांची राम कथा व दररोज सायंकाळी वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. या सोहळ्यास अयोध्येच्या राम मंदिर निर्माण न्यासचे कोषाध्यक्ष प. पू. गोविंद गिरी महाराज उर्फ आचार्य किशोर व्यासही उपस्थित राहणार आहेत.