अण्णाभाऊ साठे साहित्यरत्नच नव्हे, तर भारतरत्न- संभाजी भिडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 10:07 PM2018-08-04T22:07:12+5:302018-08-04T22:09:10+5:30
साहित्यरत्न विचारमंचाच्या कार्यक्रमात संभाजी भिडेंकडून अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचं कौतुक
सांगली : अण्णा भाऊ साठे यांनी केलेलं कार्य विचारात घेतल्यास ते केवळ साहित्यरत्नच नाहीत, तर संपूर्ण भारताला अभिमान वाटावा असे भारतरत्न आहेत, असं प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी सांगलीत केलं. मातंग समाजातर्फे शिवशंकर चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस भिडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या कामाचं कौतुक केलं. 'अण्णा भाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात दिलेलं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांचे विचार, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सर्वांनी वाटचाल केली पाहिजे. निष्पृह, उदात्त आणि समाजासाठी झटणाऱ्या या थोर व्यक्तीनं केलेलं कार्य दिशादर्शक आहे. संपूर्ण भारताला अभिमान वाटावा, असं कार्य त्यांनी केलं आहे. ते केवळ साहित्यरत्नच नाहीत, तर भारतरत्नसुद्धा आहेत. त्यामुळे भारतवासियांनी त्यादृष्टीनेच त्यांचा आदर करायला हवा', असं भिडे म्हणाले.