संभाजी पवार वाघाप्रमाणे लढले अन् जिंकलेही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:32+5:302021-03-18T04:25:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रांत संभाजी पवार हे एखाद्या वाघाप्रमाणे लढले आणि जिंकलेही, असे प्रतिपादन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रांत संभाजी पवार हे एखाद्या वाघाप्रमाणे लढले आणि जिंकलेही, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगलीत व्यक्त केले.
येथील अमरधाम स्मशानभूमीत बुधवारी सकाळी शोकसभा घेण्यात आली. यावेळी आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार प्रा. शरद पाटील, दिनकर पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, भगवानराव साळुंखे, हिंदकेसरी पै. दीनानाथसिंह, हिंदकेसरी संतोष वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, नामदेवराव माेहिते, दीपक शिंदे, आदी उपस्थित होते.
कदम म्हणाले की, चार वेळा आमदार होऊनही आप्पांचे राहणीमान व वागणे साधे होते. आप्पा आणि डॉ. पतंगराव कदम यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आप्पांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला पतंगराव कदम आले होते. मानसन्मानाच्या ते कधी भानगडीत नसायचे. कुस्ती म्हणजे त्यांचा श्वास होता.
सदाभाऊ खोत म्हणाले की, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आप्पा लढले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लढाई त्यांनी उभी केली. कुस्तीप्रेमींना त्यांची आठवण सतत व्हावी म्हणून अप्पांचे उचित स्मारक होणे गरजेचे आहे.
आमदार अरुण लाड म्हणाले की, अप्पांचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा. त्यांनी सर्वसामान्यांसाठी राजकारण केले. आमदार विक्रम सावंत म्हणाले की, आम्हाला विधिमंडळात त्यांची भाषणे वाचायला मिळतात. सर्वसामान्यांचा ते विधिमंडळातील खराखुरा आवाज होते.
शरद पाटील म्हणाले की, तब्बल ४४ वर्षांचा आमचा स्नेह होता. बंगल्यातील राजकारण रस्त्यावर आणायचे काम अप्पा आणि व्यंकाप्पांनी केले. आज शेतकरी संघटना बऱ्याच झाल्या आहेत, ऊस उत्पादकांसाठी लढणारेही अनेक आहेत; परंतु त्याची सुरुवात अप्पांनी सांगलीतून केली.
भगवानराव साळुंखे म्हणाले की, गरिबांचा कैवारी म्हणून त्यांची ख्याती होती. सर्वोदय कारखान्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.
दिलीपतात्या पाटील म्हणाले की, १९७७ ला जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर राजारामबापूंनी त्यामध्ये प्रवेश केला. त्यानंतर संभाजी पवार, व्यंकप्पा पत्की, शरद पाटील यांनीही प्रवेश केला. बापूंनी अप्पांना जनता दलाचे अध्यक्षपद दिले. बापूंवरील चांगल्या-वाईट प्रसंगात ते तिघेही बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
यावेळी श्रीमंत कोकाटे, प्रा. सुकुमार कांबळे, अरुण दांडेकर, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, डॉ. जितेश कदम, भीमराव माने, हणमंत पवार, मंगेश चव्हाण, कुस्ती निवेदक शंकर पुजारी, सुब्राव मद्रासी, मानसिंग शिंदे, आदी उपस्थित होते.
चौकट
ही उपाधी आता कोणालाही नाही
हिंदकेसरी दीनानाथसिंह म्हणाले की, 'बिजलीमल्ल' ही उपाधी यापुढे कोणाला मिळेल असे वाटत नाही. इतिहास बनविणारा कधीही जात नाही. त्यामुळेच ते आपल्या मनातून कधीही जाणार नाहीत.