गतनिवडणुकीतील नाराज संभाजी पवार गट संजयकाकांच्या प्रचारात सक्रीय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 07:37 PM2019-04-19T19:37:15+5:302019-04-19T19:40:30+5:30
संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान करू, असा निर्धार शिवसेनेचे नेते गौतम पवार यांनी सांगलीत व्यक्त केला.
सांगली : गत निवडणुकीत संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाने नाराज झालेला संभाजी पवार गट आता नाराजी दूर झाल्यानंतर प्रचारात सक्रीय झाला आहे. संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान करू, असा निर्धार शिवसेनेचे नेते गौतम पवार यांनी सांगलीत व्यक्त केला.
सांगली येथील छत्रपती शिवाजी मंडई भाजी विक्रेते संघटना, शहरातील फेरीवाले संघटनेच्यावतीने प्रचार बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संजय पाटील यांचे पुत्र युवानेते प्रभाकर पाटील, नगरसेविका स्वाती शिंदे, सुब्राव मद्रासी, सतीश पवार उपस्थित होते.
पवार म्हणाले, संभाजी पवार यांनी शहराच्या विकासासाठीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंधरा वर्षापूर्वीच त्यांनी भाजपमधून सांगलीत अनेक कामे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संभाजी पवार यांचे नाते अतूट आहे. गेल्या पाच वर्षांत जरी दुरावा निर्माण झाला तरी ऋणानुबंध कायम आहेत. पुन्हा मोदी पंतप्रधान होणे देशाच्या विकासाच्यादृष्टीने गरजेचे आहे. त्यासाठी पवार गट जीवाचे रान करेल, रात्रीचा दिवस करेल.
काँग्रेस-राष्ट्रवादीने शहर आणि जिल्ह्याला मागे नेले. येथील भाजी मंडई, फेरीवाला धोरणासह शहराच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी संजय पाटील यांना साथ द्यायला हवी. भाजपच्या माध्यमातून शहराला सर्वोत्तम बनविण्याचा प्रयत्न यापुढील काळात केला जाईल.
प्रभाकर पाटील म्हणाले, संभाजी पवार गटाच्या पाठिंब्याने आम्हाला हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांच्याही उरात धडकी भरली आहे. भाजप-सेनेच्या महायुती सरकार महिला सन्मानाच्या विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे महिला संजय पाटील यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करतील, असे सौ. रंजना संभाजी पवार यांनी व्यक्त केले. येथील गवळी गल्लीत सौ. ज्योती संजय पाटील यांच्या उपस्थितीत महिला मेळावा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे आदी उपस्थित होत्या.