संभाजीराव भिडे यांचा मनुवादी चेहरा उघड विवेक कांबळे : चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:55 AM2018-01-07T00:55:06+5:302018-01-07T00:55:29+5:30
सांगली : अॅट्रॉसिटी कायदा म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असे म्हणत शिवप्रतिष्ठानचे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनीच लोकशाहीचा खून केला.
सांगली : अॅट्रॉसिटी कायदा म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असे म्हणत शिवप्रतिष्ठानचे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनीच लोकशाहीचा खून केला. अशाप्रकारच्या वक्तव्यातून त्यांचा मनुवादी चेहरा सर्वांसमोर आला आहे, अशी टीका आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी महापौर विवेक कांबळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
कांबळे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेने दलितांसह तब्बल ५९ जातींना अॅट्रॉसिटीनुसार न्याय्य हक्काचा अधिकार दिला आहे. असे असताना भिडे यांनी या कायद्यावरच टीका केली. त्यांना जाती-जातीत भांडणे लावून चातुर्वर्णीय व्यवस्थेचा पुरस्कार करीत मनुवादी राज्य आणायचे आहे. कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने जाती-धर्मात भांडणे लावणारी ही प्रवृत्ती वेळीच रोखली पाहिजे. कोरेगाव-भीमा व सांगलीतही घडलेल्या तोडफोडीच्या घटना निंदनीय आहेत, पण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला, तर भिडे आणि मिलिंद एकबोटे हेच दोषी आहेत, हे दिसून येईल. त्यांच्यावर दंगली भडकविण्याचे आरोप झाले आहेत. तसे गुन्हेही दाखल झाले आहेत. असे असताना भिडे यांनी जनतेची दिशाभूल करीत अॅट्रॉसिटीसारख्या घटनात्मक अधिकारालाही नावे ठेवून या प्रकाराला वेगळे वळण देण्याचा उद्योग सुरू केला आहे.
कांबळे म्हणाले की, लोकांना दोनवेळच्या पोटाची भ्रांत आहे, बेकारीचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत भिडे कधीच बोलत नाहीत. उलट चारशे-पाचशे वर्षांपूर्वीच्या इतिहासात मोडतोड करून सोयीस्कर अर्थ काढत बहुजन समाजातील तरुणांची डोकी भडकविण्याचे काम ते करीत आहेत. त्यांनी बहुजनातील मुलांना शैक्षणिक क्षेत्रापासून तसेच पुरोगामित्वापासून दूर करण्याचा एकप्रकारे विडाच उचलला आहे. अशा मनुवादी, स्वयंघोषित गुरुजींपासून तरुणांना वाचविणे गरजेचे आहे.
यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, बापू सोनावणे उपस्थित होते.
मराठा, लिंगायत समाजावर टीका का?
कांबळे म्हणाले की, विद्यमान सरकारच्या प्रेमापोटी भिडे यांनी मराठा क्रांती मोर्चा आणि लिंगायत मोर्चावरही टीका केली. वास्तविक या दोन्ही समाजांनी आपापल्या न्याय्य मागण्या लोकशाही मार्गाने संविधानिकरित्या सरकारसमोर मांडल्या. या मोर्चांच्या माध्यमातून सरकारला अडचणीत आणू पाहणारे लोक सत्तापिपासू आहेत, अशी टीका भिडे यांनी जाणीवपूर्वक केली. मराठा क्रांती मोर्चा, लिंगायत मोर्चावरही टीका करून दिशाभूल सुरू केली आहे. समाजा-समाजात फूट फाडून दंगलीच घडविण्याचा यांचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो.
उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कांबळे म्हणाले की, या मनुवादी प्रवृत्तीविरोधात सोमवार, दि. ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आरपीआयच्यावतीने धडक मोर्चा काढणार आहोत. भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक झालीच पाहिजे, यासाठी हा लढा आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी शनिवारी बैठक घेतली. तणावपूर्ण स्थिती असल्याने मोर्चा काढू नये, अशीही विनंती केली. पण आम्हाला ती मान्य नाही. आम्ही मोर्चा काढणारच. लोकशाही मानणाºया आणि मनुवादी विचाराला विरोध करणाºयांनी सोमवारच्या मोर्चात सामील व्हावे.