१४ फूट उंचीची दीड टन वजनाची मूर्ती; सांगलीत सांभारे गणपतीची ७२ वर्षांनंतर मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 04:29 PM2024-09-19T16:29:50+5:302024-09-19T16:29:50+5:30
भक्तांचा मोठा जल्लोष; सांगलीकरांची प्रचंड गर्दी
सांगली : येथील गावभागातील सांभारे वाड्यातील भव्य १४ फूट उंच आणि १० फूट रुंदीच्या तसेच दीड टन वजनाच्या दुर्मीळ मूर्तीची तब्बल ७२ वर्षांनंतर मिरवणूक निघाली. या दुर्मीळ मूर्तीची मिरवणूक पाहण्यासाठी सांगलीकरांनी प्रचंड गर्दी केली.
यंदा गणपतीच्या स्थापनेला १२५ वर्षे झाली. गावभागातील सांभारे वाड्याचे प्रमुख आबासाहेब सांभारे हे संस्थान काळात पटवर्धन राजेसाहेबांकडे राजवैद्य होते. १८९९ साली त्यांनी मूर्ती स्थापना केली. मूर्ती पांगिरा लाकडापासून बनविलेली आहे. त्यात भुस्सा, कागदी लगदा वापरून आकार दिला आहे.
१९५२ सालापर्यंत मिरवणूक होत होती. विजेचे खांब अडथळे ठरू लागल्यामुळे मिरवणूक खंडित करावी लागली. केदार सांभारे यांनी पुन्हा मिरवणूक सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. तर गणेशभक्तांनी त्यांना साथ दिली. दीड टन वजनाची मूर्ती मंगळवारी मिरवणुकीसाठी बाहेर काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर करत मिरवणूक निघाली. लेझीम पथक सहभागी होते.
पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी फुगडीचा फेर धरला. तर फेटे आणि पारंपरिक वेशभूषेसह भक्त सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी विविध मार्गांवर गर्दी झाली होती.
मिरवणुकीत खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, आदित्यराजे पटवर्धन आदींनी दर्शन घेतले.
अनेक मंडळांची मिरवणूक
सांगलीत अनंत चतुर्दशीला अनेक मंडळांनी परिसरात काही अंतरापर्यंत मिरवणूक काढून सरकारी घाटावर गणपती विसर्जन केले. सातव्या, नवव्या दिवशी अनेक मंडळांच्या मिरवणुका निघाल्यामुळे दहाव्या दिवशी मिरवणुकांचा जल्लोष नव्हता.