सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीकरीता जुनेच पथक दाखल, 'एसआयटी'बाबत अद्याप आदेश नाहीत

By अविनाश कोळी | Published: March 27, 2023 04:54 PM2023-03-27T16:54:14+5:302023-03-27T16:54:32+5:30

मात्र अंतिम टप्प्यात पथक बँकेत फिरकलेच नाही

Same old team filed for investigation of Sangli District Bank, no orders yet regarding SIT | सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीकरीता जुनेच पथक दाखल, 'एसआयटी'बाबत अद्याप आदेश नाहीत

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीकरीता जुनेच पथक दाखल, 'एसआयटी'बाबत अद्याप आदेश नाहीत

googlenewsNext

सांगली : सहकारमंत्र्यांनी एकीकडे सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीकरीता विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्तीची घोषणा केली असतानाच यापूर्वी नियुक्त केलेली चौकशी समिती जिल्हा बँकेत दाखल झाली आहे. काही दिवसांपासून थांबलेले चौकशीचे काम समिती सदस्यांनी पुन्हा सुरु केल्याने अनेकांच्या भुवया वर गेल्या आहेत.

जिल्हा बँकेच्या चौकशीचा गोंधळ अद्याप दूर झालेला नाही. सहकारमंत्री अतुल सावे यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीकरीता विशेष तपास पथक नियुक्तीची घोषणा केली होती. त्याचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. यापूर्वी विभागीय सहनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील पाचजणांच्या समितीने तक्रारीच्या अनुषंगाने बँकेतील अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची चौकशी अंतिम टप्प्यात आणली होती. २८ फेब्रुवारीला त्यांचा अहवाल सादर होणार होता; मात्र अंतिम टप्प्यात पथक बँकेत फिरकलेच नाही. त्यामुळे तक्रारदारांनी याबाबत विचारणा केली होती.

चौकशी थांबल्याबाबत तक्रारदार सुनील फराटे यांनी सहकार विभागाकडे पुन्हा तक्रार केल्याने सहकार विभागाने २८ फेब्रुवारीस पुन्हा आदेश काढून मुदतीत अहवाल सादर करण्याची सूचना दिली, मात्र मार्चमध्ये समितीमार्फत कोणतेही काम होऊ शकले नाही. आता हीच समिती मार्चअखेरीस बँकेत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विभागीय सहनिबंधक डी.टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील पथकात विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे, संजय पाटील, अनिल पैलवान, द्वितीय अपर लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांचा समावेश आहे. यातील तीन सदस्य सोमवारी सांगली जिल्हा बँकेच्या मुख्यालयात चौकशीकरीता आले होते. उर्वरीत सदस्य मंगळवारी येणार आहेत. त्यानंतर त्यांच्यामार्फत चौकशीचे उर्वरीत कामकाज पूर्ण केले जाणार आहे

Web Title: Same old team filed for investigation of Sangli District Bank, no orders yet regarding SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.