संपर्कक्रांती एक्स्प्रेसला सांगलीशी संपर्क ठेवण्याचे वावडे का?, महाराष्ट्राच्या वाट्याला तीनच थांबे
By अविनाश कोळी | Published: February 3, 2024 01:51 PM2024-02-03T13:51:27+5:302024-02-03T13:52:10+5:30
प्रवासी संघटनांची मागणी दुर्लक्षित
अविनाश कोळी
सांगली : देशभरातील बहुतांश संपर्कक्रांती एक्स्प्रेस गाड्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांना झुकते माप दिले आहे. सांगली स्थानकावर या गाडीचा थांबा मागितल्यानंतर अस्तित्वात नसलेल्या नियमाकडे बोट दाखवले जाते. त्यामुळे संपर्कक्रांतीचा सांगलीशी संपर्क होणार की नाही? असा प्रश्न प्रवासी संघटनांमधून विचारला जात आहे.
सांगली हे जिल्ह्याचे प्रमुख केंद्र असून, पुणे विभागात उत्पन्न मिळवून देण्यात सांगलीचे स्थानक आघाडीवर आहे. तरीही सांगलीच्या प्रवाशांचा विचार गाड्यांना थांबा देताना केला जात नाही. त्यामुळे प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
देशभरात धावणाऱ्या १० संपर्कक्रांती गाड्यांना एकाच राज्यात दोनपेक्षा अधिक थांबे आहेत तर काही संपर्कक्रांती गाड्यांना तर एकाच राज्यात ४, ५, ६ व ८ थांबे आहेत. मग सांगलीतच संपर्कक्रांतीला थांबा का नाही? हा प्रश्न अनेक प्रवासी विचारत आहेत.
थांब्याचा नियम शिथिल
संपर्कक्रांती रेल्वे गाड्यांना स्वतःचे राज्य वगळून इतर राज्यांमध्ये फक्त दोनच थांबे देता येतात, असा नियम पूर्वी होता. परंतु, हा नियम शिथिल करून रेल्वे बोर्डाने अनेक राज्यांमध्ये दोनपेक्षा अधिक थांबे दिले आहेत.
प्रवासी संघटनांची मागणी दुर्लक्षित
सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुप, इतर प्रवासी संघटना, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स व नागरी जागृती मंचनेही संपर्कक्रांतीला सांगलीत थांबा देण्याची मागणी केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
सांगली शहराला विमानतळ नाही. राष्ट्रीय महामार्ग सांगली शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. फक्त सांगली रेल्वे स्थानक हे शहराच्या मध्यभागात सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीशेजारी असल्याने संपर्कक्रांतीला सांगली शहरात थांबा दिल्यास सांगलीत येणाऱ्या-जाणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांची खूप मोठी सोय होणार आहे. - रोहित गोडबोले, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप
संपर्कक्रांतीला थांबे, कंसात थांबे दिलेले राज्य
रेल्वेचे नाव - थांबे
बिहार संपर्कक्रांती - ६ (उत्तर प्रदेश)
आंध्र संपर्कक्रांती - ८ (तेलंगणा)
छत्तीसगढ संपर्कक्रांती - ५ (मध्य प्रदेश)
उत्तर संपर्कक्रांती - ५ (पंजाब)
गोवा संपर्कक्रांती - ४ (महाराष्ट्र)
कर्नाटक संपर्कक्रांती - ४ (महाराष्ट्र)
पश्चिम बंगाल संपर्कक्रांती - ३ (उत्तर प्रदेश)
पूर्वोत्तर संपर्कक्रांती - ३ (उत्तर प्रदेश)
केरळ संपर्कक्रांती - ३ (महाराष्ट्र)