चांदोली धरण परिसरात संततधार सुरूच
By admin | Published: June 22, 2015 11:59 PM2015-06-22T23:59:14+5:302015-06-22T23:59:14+5:30
जिल्ह्यात पावसाची उसंत : धरण पाणीसाठ्यात ०.६८ टीएमसीने वाढ
वारणावती : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, मागील २४ तासांत १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाची पातळी एक मीटरने वाढली आहे. धरणाची पाणीपातळी ६०९.५० मीटर म्हणजेच १९.३६ टीएमसी झाली आहे. एकूण पाऊस ४४० मिलिमीटर झाला आहे.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३१७.६७ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रातून धरणात पाणी येत आहे. डोंगर-दऱ्यातून मोठ्याप्रमाणात येणाऱ्या पाण्यामुळे धबधबे कोसळू लागले आहेत. धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ०.९५ मीटरने पाणी पातळी वाढली आहे. सोनवडे, मणदूर, आरळा, गुढेतील ऊस व भात शेतीत पाणी साचले आहे. तीन दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने हा परिसर अंधारात असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. वारणा नदी दुथडी भरून वहात आहे.
शिराळा : शिराळा तालुक्यात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली. मात्र सोमवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे. लहान-मोठ्या काही पावसाच्या सरी आज पडत होत्या.
गेले दोन दिवस मान्सूनने तालुक्यात चांगली हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान पसरले आहे. गेल्या चोवीस तासात शिराळा, कोकरूड, चरण, मांगले, सागाव, चांदोली धरण या भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. धरणातील पाणीपातळीत ०.६८ टीएमसीने वाढ झाली आहे. धरण पातळी ६०९. ५० मी., पाणीसाठा ५४८.३८ द.ल.घ.मी., उपयुक्त पाणीसाठा ३५३.५४ आहे. धरणात १२.३६ पाणीसाठा असून, ५६.२९ टक्के धरण भरले आहे. वीज निर्मिती केंद्रातून ५४२ क्युसेकने पाणी विसर्ग चालू आहे. (वार्ताहर)
शिराळ्यातील पाऊस
गेल्या चोवीस तासात मंडलनिहाय पडलेला पाऊस व कंसात एकूण पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे- शिराळा ६६ (१८६), शिरशी ३१ (९७), कोकरूड ९० (२४०), चरण ६५ (२१९), मांगले ७८ (२२९), सागाव ६५ (२१५), चांदोली धरण १७० (४४०)