सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, अतुल भोसले यांची विधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:09 PM2022-05-31T19:09:54+5:302022-05-31T19:10:43+5:30
विधानपरिषदेवर डॉ. अतुल भोसले व सम्राट महाडिक यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण
अशोक पाटील
इस्लामपूर : भाजपच्या कोट्यातून २०१६ मध्ये विधानपरिषदेवर गेलेल्या आमदारांची मुदत यंदा संपली. आता त्या १० जागांसाठी निवडणूक होत असून, डॉ. अतुल भोसले व सम्राट महाडिक यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्याचवेळी इस्लामपूरचे मावळते नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. विधानसभेवेळी अतुल भोसले दक्षिण कऱ्हाडमधून भाजपच्या उमेदवारीवर, तर सम्राट महाडिक शिराळा मतदारसंघात व निशिकांत पाटील इस्लामपुरातून बंडखोरी करून लढले होते.
भाजपच्या कोट्यातून २०१६ मध्ये सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले, राज्यमंत्रीपदही देण्यात आले. त्यानंतर त्यांनी रयत क्रांती शेतकरी संघटना स्थापन केली. मात्र २०१९ मध्ये राज्यात भाजपविरोधातील सरकार सत्तेवर आले. आता खोत यांना भाजपमधून विधानपरिषदेवर संधी मिळणे दुरापास्त आहे. त्यांनी पुन्हा आमदारपद मिळण्यासाठी शरद पवारांसह महाआघाडी सरकारला लक्ष्य केले आहे.
इस्लामपूरचे मावळते नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. त्यांनी इस्लामपुरातून शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकल्याने ते चर्चेत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी फिल्डिंग लावल्याचे समजते.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी कऱ्हाडमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात भाजपची बांधणी केली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात त्यांनी खिंड लढवली आहे. त्यामुळे विधानपरिषदेवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र भोसले ही निवडणूक लढविण्यास तयार नाहीत. विधानसभा निवडणुकीत शिराळ्यात सम्राट महाडीक यांची बंडखोरी भाजपच्या शिवाजीराव नाईक यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली.
महाडीक यांना मिळालेल्या ५० हजार मतांचा विचार करूनच महाडीक बंधूंना भाजपने पक्षात घेतले. जिल्हा बँक निवडणुकीत राहुल महाडीक यांनी विरोध असतानाही बाजी मारली. शिराळा मतदारसंघ वाळवा तालुक्याशी निगडित असल्याने भाजपने महाडीक बंधूंना ताकद देण्याचे निश्चित केले आहे. त्यातून विधान परिषदेसाठी सम्राट महाडीक यांचे नाव पुढे आले आहे.
अतुल भोसलेंचे लक्ष्य विधानसभा निवडणूक
डॉ. अतुल भोसले मुंबईत आहेत. त्यांचे लक्ष्य २०२४ ची विधानसभा आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी इच्छुक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.