इस्लामपूरच्या भुयारी गटार योजनेस मंजुरी

By Admin | Published: April 12, 2017 11:44 PM2017-04-12T23:44:57+5:302017-04-12T23:44:57+5:30

दहा तासांची ऐतिहासिक सभा : वीस विषयांना मंजुरी, एक तहकूब, तर एक विषय रद्द; सभेत शेरेबाजी, वाद-प्रतिवाद

Sanctioning of Islampur underground sewerage scheme | इस्लामपूरच्या भुयारी गटार योजनेस मंजुरी

इस्लामपूरच्या भुयारी गटार योजनेस मंजुरी

googlenewsNext



इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेच्या स्थापनेपासून इतिहासात १० तासांहून अधिक काळ चाललेल्या या ऐतिहासिक सर्वसाधारण सभेत शेरेबाजी, वाद-प्रतिवाद, विरोधकांनी बहुमताच्या जोरावर उपसलेले ‘उपसूचने’चे संसदीय आयुध आणि पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दाखविलेला संयमित आक्रमकपणा... अशा अनेक अंगांनी ही सभा गाजली. विषयपत्रिकेवरील २२ पैकी १ विषय तहकूब, तर १ विषय रद्द ठेवून इतर सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
येथील पालिकेच्या अण्णासाहेब डांगे सभागृहात नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११.३० वाजता सुरू झालेली ही सर्वसाधारण सभा रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू राहिली. या दहा तासांच्या काळात प्रत्येकी १० मिनिटासाठी चारवेळा कामकाज तहकूब करण्यात आले. चर्चेदरम्यान सत्तारूढ विकास आघाडीसह विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पाडलेला कायद्याचा किस, अभ्यासपूर्ण विवेचनाला दिलेली कायदेशीर किनार, कधी गदारोळ, तर कधी खेळीमेळीचे वातावरण अशा परिस्थितीत या सभेचे कामकाज चालले.
सभेच्या सुरुवातीस मागील सभांचे कार्यवृत्तांत कायम करण्याच्या विषयावेळी सत्तारुढ गटाला घेरण्याची व्यूहरचना करून आलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी संसदीय आयुधांचा वापर करायला सुरुवात केली. पहिल्याच विषयावर राष्ट्रवादीच्या विश्वास डांगे यांनी उपसूचना दिली. त्यावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर शेवटी बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादी सदस्यांनी ही उपसूचना १५ विरुध्द १४ अशा मतफरकाने स्वीकारायला भाग पाडून सत्ताधाऱ्यांना पहिला दणका दिला. त्यानंतर प्रत्येक विषयावर उपसूचना देऊन खिंडीत पकडले जाणार, हे ओळखून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी समन्वयाच्या भूमिकेवर भर देत राष्ट्रवादी सदस्यांच्या सूचनांचा ठरावात अंतर्भाव करीत विषय मंजुरीस हात घातला.
विविध विभागांच्या वार्षिक निविदा काढण्याच्या विषयावर आरोग्य सभापती डॉ. संग्राम पाटील यांनी दोन स्वतंत्र उपसूचना देऊन साहित्य खरेदीचे अधिकार विषय समित्यांना देण्याची मागणी करुन खळबळ माजवली. तब्बल तीन तास या विषयावर चर्चा झाली. विकास आघाडीचे विक्रम पाटील आणि राष्ट्रवादीचे संजय कोरे यांच्यात पूर्ण सभेच्या कामकाजात होकाराची जुगलबंदी रंगली. विक्रम पाटील यांनी १५ वर्षांच्या सत्ताकाळात काम करताना शहराचे वाटोळे केले, असा आरोप केल्यावर संतापलेल्या राष्ट्रवादीचे संजय कोरे, शहाजी पाटील, आनंदराव मलगुंडे, विश्वास डांगे, खंडेराव जाधव, चिमण डांगे यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
शेवटी नगराध्यक्ष पाटील यांनी, वार्षिक निविदा काढण्याचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. याची जाणीव सदस्यांनी ठेवावी. पाणी, दिवाबत्ती, आरोग्य या मूलभूत गरजा पुरवणे हे कर्तव्य आहे. वार्षिक निविदा पद्धतीमुळे समित्यांच्या अधिकारावर गदा येणार नाही. त्यामुळे ठराव मंजूर करण्याची विनंती केली.
विक्रम पाटील यांनी, खासगी एजन्सीकडून अडचणी निर्माण केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला अधीन राहून ठराव करावा असे सुचवले. शेवटी नगराध्यक्ष पाटील यांनी, स्वत:च्या अधिकारात ही उपसूचना स्वीकारता येणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गदारोळ केला.
भुयारी गटार योजनेची कार्यवाही करण्यास मंजुरी देण्याच्या विषयावरही सभागृहात खडाजंगी झाली. डॉ. संग्राम पाटील यांनी, योजना वापर कर आणि मालमत्ता कराचे पूर्वमूल्यांकन करण्याच्या अटीमधून शहरातील नागरिकांवर ६ ते ७ कोटीच्या कराचा बोजा पडणार असल्याकडे लक्ष वेधून, या अटी शिथिल करण्याची उपसूचना दिली. सभेतील चर्चेत शकील सय्यद, अमित ओसवाल, आनंदराव पवार, वैभव पवार, बाबासाहेब सूर्यवंशी, सतीश महाडिक, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, सविता आवटे, वैशाली सदावर्ते यांनी भाग घेतला. (वार्ताहर)
औटघटकेचा मान..!
पालिकेच्या या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक मोर्चेबांधणी केली होती. सभेची वेळ झाली तरी पीठासीन अधिकारी सभागृहात उपस्थित नाहीत, त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार उपाध्यक्षांनी पीठासीन अधिकारी म्हणून स्थान ग्रहण करावे, असे सुचवत संजय कोरे यांनी आपला आक्रमकपणा स्पष्ट केला. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी स्थान ग्रहण केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र अवघ्या तीन मिनिटातच नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सभागृहात आगमन केल्याने पीठासीन अधिकाऱ्याचा मान हा राष्ट्रवादीसाठी औटघटकेचा ठरला.

Web Title: Sanctioning of Islampur underground sewerage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.