पावसाअभावी वाळू ठेकेदारांची चांदी

By admin | Published: July 14, 2014 12:29 AM2014-07-14T00:29:01+5:302014-07-14T00:34:26+5:30

बेसुमार उपसा : वाळू ठेकेदारांना अवर्षणाचा बोनस, आठ ठेक्यांमधून महसूल विभागाला सात कोटींचे उत्पन्न

Sand contractor silver due to lack of rain | पावसाअभावी वाळू ठेकेदारांची चांदी

पावसाअभावी वाळू ठेकेदारांची चांदी

Next

सदानंद औंधे : मिरज, दोन महिने पाऊस नसल्याने वाळू ठेकेदारांची चांदी झाली आहे. अवर्षणाचा इतरांना फटका बसला असला, तरी पावसामुळे मिळालेला बोनस वसूल करण्यासाठी नदीपात्रातून दिवस रात्र वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे.
मिरज परिसरात कृष्णाघाट, ढवळी, म्हैसाळ येथील आठ वाळू ठेक्यांपासून महसूल विभागाला सात कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तब्बल चार वर्षांनंतर यावर्षी वाळू उपसा ठेका देण्यात आल्याने दुप्पट महसूल वसूल झाला आहे. वाळू उपसा ठेक्याला एक महिना उशीर झाल्याची तक्रार करणाऱ्या वाळू ठेकेदारांना पावसाअभावी बोनस मिळाला आहे. वाळू ठेक्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असली, तरी जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली की दोन महिने वाळू उपसा व वाहतूक बंद होते. यावर्षीही जून महिन्यातील पाऊस अपेक्षित धरुन वाळू ठेकेदारांनी जूनपूर्वीच मोठ्या प्रमाणात उपसा करून वाळू साठे करून ठेवले आहेत. मात्र जून व जुलै महिन्यात पावसाचा पत्ता नसल्याने वाळू ठेकेदारांचा दुप्पट वेगाने वाळू उपसा सुरू आहे. संधीचा फायदा घेण्यासाठी वाळू ठेकेदारांत मोठी स्पर्धा असल्याने दिवस-रात्र वाळू उपसा सुरू आहे. ढवळीत वाळू चाळल्यानंतर शिल्लक राहणारी मोठी वाळू मोठ्या प्रमाणात नदीपात्रात टाकण्यात येत आहे. नदीपात्रात असणाऱ्या जॅकवेलशेजारी दोनशे फूट अंतरावर वाळू उपसा करण्यास मनाई असली, तरी बेधडक जॅकवेलशेजारी वाळू उपसा सुरू आहे. म्हैसाळ परिसरात वाळूचा एकच अधिकृत ठेका असला, तरी रात्रीच्यावेळी नदीपात्रात बोटी सोडून चोरटा वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
म्हैसाळ परिसरात कर्नाटक हद्दीलगत शेतात अवैध वाळू साठे करण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय पवार यांनी म्हैसाळात छापा टाकून अवैध वाळू साठा पकडला. मात्र त्यानंतरही वाळूचे चोरटे साठे केले असल्याच्या तक्रारी आहेत. ढवळीत ग्रामपंचायतीच्या हद्दीत वाळू उपसा कोण करावयाचा यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दोन गटांत हाणामारी झाली. त्यानंतर स्वत:च्या क्षेत्राबाहेर सामंजस्याने वाळू उपसा करण्याबाबत दोन्ही गटांत समझोता झाल्याची माहिती मिळाली. ढवळीत वाळू उपसा ठेक्यासाठी नदीकाठी जागा न मिळाल्याने नदीपात्रात भराव करून वाळू साठा करण्यात येत आहे. वाळू उपशाचा ठेका सुरू असलेल्या गावात मंदिरे, धार्मिक स्थळे, कमानी, रस्ते यासाठी ठेकेदार मोठ्या देणग्या देत आहेत.

----तालुक्यात पथके नियुक्त करण्यात आली आहेत. रात्रीची गस्त घालण्यात येत आहे. परजिल्ह्यातून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे. वाळू चोरट्यांवर फौजदारी कारवाईच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. बेकायदा वाळू उपसा किंवा वाळू चोरी सुरू असल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- विजय पवार,
अतिरिक्त जिल्हाधिकारी
----- पाऊस नसल्याने वाळू ठेकेदारांना बोनस मिळाला, हे चुकीचे आहे. पाऊस पडल्याने वाळूची टंचाई होते. मागणी वाढल्याने दर वाढतात व त्याचा आम्हाला फायदा होतो. शासनाचे सर्व नियम पाळून वाळू ठेका चालविणे सोपे नाही. रात्रीच्यावेळी वाळू उपसा करण्याबाबत आम्हाला सवलत मिळत नाही. वाळू ठेकेदारांना त्रासच जास्त असल्याने वाळू ठेका घेऊन आम्ही चूकच केली आहे.
- वर्धमान अवधूत,
वाळू ठेकेदार, ढवळी

Web Title: Sand contractor silver due to lack of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.