महसूल पथकावर वाळू तस्करांचा हल्ला

By admin | Published: January 4, 2015 12:56 AM2015-01-04T00:56:17+5:302015-01-04T00:56:42+5:30

भाळवणीतील घटना : दगडफेक, धक्काबुक्की

Sand smugglers on revenue department | महसूल पथकावर वाळू तस्करांचा हल्ला

महसूल पथकावर वाळू तस्करांचा हल्ला

Next

विटा : भाळवणी (ता. खानापूर) येथील येरळा नदीपात्रातील वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या विट्याच्या महसूल पथकावर तस्करांनी शिवीगाळ, धक्काबुक्की आणि प्रचंड दगडफेक करत प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना आज, शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी वांगी (ता. कडेगाव) येथील सात वाळू तस्करांसह सुमारे २२ ते २४ जणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भाळवणी येथील येरळापात्रातून वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज पहाटे तहसीलदार अंजली मरोड, गावकामगार तलाठी एस. व्ही. यादव, एस. एस. सुर्वे, विनायक पाटील, एस. जे. निकम, विशाल कदम, एम. व्ही. पाटील यांच्या पथकाने शिकलगार वस्तीजवळ नदीपात्रात छापा टाकला.
त्यावेळी उमेश शंकर साळुंखे, गणेश शंकर साळुंखे व राकेश अशोक साळुंखे (सर्व रा. साळुंखे वस्ती, वांगी) चार ट्रॅक्टरमधून वाळूची तस्करी करीत असल्याचे दिसले. ते ट्रॅक्टर जागेवर पकडताच या पथकावर उमेश साळुंखे, गणेश साळुंखे, राकेश साळुंखे, सूरज दिलीप पाटील, संग्राम अरुण जाधव, प्रवीण उत्तम जाधव, अमोल हणमंत हगवणे (सर्व रा, वांगी) यांच्यासह अनोळखी सुमारे १५ ते १७ व्यक्तींनी शिवीगाळ, धक्काबुक्की व प्रचंड दगडफेक करतहल्ला चढविला. त्यानंतर वाळू तस्करांनी चारपैकी दोन ट्रॅक्टर घेऊन पलायन केले. हे दोन ट्रॅक्टर राकेश साळुंखे व गणेश साळुंखे यांच्या मालकीचे आहेत. महसूल पथकाने या हल्ल्याचा सामना करीत दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
गावकामगार तलाठी एस. जे. निकम यांनी वांगीतील सातजणांसह अनोळखी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील सूरज पाटील व प्रवीण जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, महसूल पथकावर वाळू तस्करांकडून झालेल्या हल्ल्याचा महसूल कर्मचारी संघटना व तलाठी संघटनेने निषेध केला आहे. वाळू तस्करी रोखणाऱ्या पथकाला पोलीस संरक्षण देण्याबरोबरच या घटनेतील फरारी संशयितांना तातडीने अटक करावी, अशी मागणी तलाठी संघटनेचे अध्यक्ष एस. जे. निकम यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Sand smugglers on revenue department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.