Sangli News: आटपाडी तालुक्यात खुलेआम वाळू तस्करी, महसूलकडून मिळतेय अभय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 05:07 PM2023-01-04T17:07:02+5:302023-01-04T17:07:34+5:30
पुरावे देवूनही कोणतीच कारवाई केली जात नाही
आटपाडी : आटपाडी तालुक्यामध्ये खुलेआम वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून आटपाडीच्या शुक ओढा पात्राची वाळू तस्करांनी चाळण केली आहे. महसूल विभागाच्या कृपाशीर्वादानेच वाळू तस्करी फोफावली आहे. काही वाळू तस्करांना मिळणारे अभय चर्चेचा विषय ठरला असून सांगली व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून राजरोसपणे वाळू तस्करी होत आहे.
काही महिन्यांपासून वाळू तस्करी कमी होताना दिसत होती. मात्र काही ठरावीक महाबहाद्दर तस्करांनी महसूलच्या आशीर्वादाने डोके वर काढले आहे. आटपाडीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शुक ओढा पात्राशेजारी असणाऱ्या लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीलगत मागील दोन दिवसांपासून मोठमोठे खड्डे खणून वाळू तस्करी केली आहे.
विस्तीर्ण ओढा पात्र वाळू तस्करांनी अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. शुक ओढ्यामध्ये असणारी शेकडो झाडे वाळू तस्करीने उन्मळून पडली आहेत. शुक ओढा पात्रात भरणाऱ्या आठवडी बाजार परिसर, बाजार समितीकडे जाणाऱ्या पुलाशेजारील असणारा स्मशानभूमी परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, श्रीराम मंदिर व अंगणवाडी परिसर या ठिकाणी अनेक खड्डे पाडून ओढा पात्राची चाळण केली आहे. याबाबत महसूल प्रशासन काय करत आहे, असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे.
महसूल प्रशासनाने वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून रात्रपाळीमध्ये गस्त घातली जाते. मात्र तरीही वाळू तस्करी होत आहे. या मागे नेमके कोणते अर्थकारण काम करत आहे काय, असा सवाल विचारला जात आहे.
अवैध वाळू साठा
आटपाडी तालुक्यापासून काही अंतरावर असणाऱ्या सांगली-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर महसूलच्याच आशीर्वादाने वाळू उपसा जोमात सुरू आहे. राजरोसपणे तेथून वाळू उपसा करून तो आटपाडी तालुक्याच्या व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आणून त्याचा साठा केला जात आहे.
पुरावे देऊनही कारवाईकडे दुर्लक्ष
आटपाडी शहरामध्ये अवैध वाळू साठवण केले जात असल्याचे पुरावे तलाठी यांना पाठवूनही त्याबाबत कोणतीच कारवाई केली जात नाही. मग अवैध वाळू तस्करी व साठवणूक करणाऱ्यांना अभय कोणाचे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.