सावळज, अंजनी, हिंगणगावसह तेरा ठिकाणी वाळू उपसा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:18 AM2021-01-10T04:18:54+5:302021-01-10T04:18:54+5:30
सांगली : जिल्ह्यात वाळू उपशासाठी तेरा ठिकाणे जिल्हा प्रशासनाने निश्चित केली आहेत. ती उपशासाठी योग्य असल्याचा अहवाल तालुकास्तरीय सनियंत्रण ...
सांगली : जिल्ह्यात वाळू उपशासाठी तेरा ठिकाणे जिल्हा प्रशासनाने निश्चित केली आहेत. ती उपशासाठी योग्य असल्याचा अहवाल तालुकास्तरीय सनियंत्रण समित्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
जिल्ह्यात २०१६ पासून वाळू उपसा बंद आहे. हरित न्यायालयाने अटी लागू केल्याने उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे बांधकामे प्रचंड अडचणीत आली. कृत्रिम वाळूचा वापर करावा लागला. आता अटींची पूर्तता करत नव्याने लिलाव केले जाणार आहेत. गेल्या चार वर्षांत मुबलक पाऊस झाल्याने नदी-नाले व ओढ्यांमध्ये पुरेसा वाळूसाठा झाला आहे. त्याच्या सर्वेक्षणासाठी तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या नेमण्यात आल्या होत्या. समित्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात तेरा ठिकाणी वाळू उपसा करता येईल, असे सुचविले आहे. त्यासाठी संबंधित गावांची संमतीही घेतली जाणार आहे. या वाळू औट्यांसाठी तीस दिवसांत सूचना व अभिप्राय सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यांचा विचार करुन लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
वाळू उपशासाठी प्रस्तावित ठिकाणांमध्ये अग्रणी नदीचाही समावेश आहे. अग्रणीच्या पुनरुज्जीवनानंतर तेथे पुन्हा वाळू उपशाला काही गावांनी विरोध दर्शविला आहे. तरीही प्रशासनाने हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ ) व सावळज, अंजनी (ता. तासगाव) येथे अग्रणी नदीतून उपशाचे नियोजन केले आहे. अग्रण धुळगावच्या ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे.
चौकट
येथे होईल वाळू उपसा
नांदणी नदी - मौजे शिवणी ( ता. कडेगाव ), माण नदी - विठलापूर ( ता. आटपाडी), कोरडा नदी - वाळेखिंडी, सिंगनहळ्ळी (ता. जत). बोर नदी - खंडनाळ, मुचंडी, जालिहाळ खुर्द (ता. जत). अग्रणी नदी - हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ ), सावळज, अंजनी (ता. तासगाव).
----------