वाळू तस्करांची वाहने पेटवून देणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:18 PM2020-01-29T12:18:14+5:302020-01-29T12:19:40+5:30
वाळू तस्करांनो आमच्या गावात येऊ नका. आलात तर तुमची वाहने पेटवून देऊ, असा जाहीर इशारा खांजोडवाडी (ता. आटपाडी) येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनालाही न भिणाऱ्या वाळू तस्कारांचे धाबे, वाहने पेटविण्याच्या इशाऱ्याने दणाणले आहे.
अविनाश बाड
आटपाडी : वाळू तस्करांनो आमच्या गावात येऊ नका. आलात तर तुमची वाहने पेटवून देऊ, असा जाहीर इशारा खांजोडवाडी (ता. आटपाडी) येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनालाही न भिणाऱ्या वाळू तस्कारांचे धाबे, वाहने पेटविण्याच्या इशाऱ्याने दणाणले आहे.
खांजोडवाडी येथील माणगंगा नदीच्या पात्रातून वाळू तस्करी करताना दि. ६ फेब्रुवारी २0१९ रोजी बापू विष्णू सूर्यवंशी यांचा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला होता. हा ट्रॅक्टर बदलून दिल्याप्रकरणी पोलिसांनी नायब तहसीलदार बाळासाहेब महादेव सवदे, तलाठी संघटनेचा तालुकाध्यक्ष बजरंग जयवंत लांडगे आणि गोदामपाल भारत लालाप्पा बल्लारी यांच्यावर, चोरीस साहाय्य केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाने वाळू तस्करांबरोबरच भ्रष्ट शासकीय यंत्रणेविरूध्द तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
ज्या खांजोडवाडीतील वाळू तस्करांमुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले, त्या गावात शुक्रवारी दुपारी ग्रामस्थांनी बैठक घेतली. बैठकीत गावाच्या परिसरातील माणगंगा नदीच्या पात्रातून होत असलेल्या बेसुमार वाळू तस्करीबद्दल संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
वाळू तस्करांच्या आलिशान मोटारीतून महसूल विभागाचे आणि पोलीस कर्मचारी फिरत आहेत. शिवाय ते कसा पाहुणचार घेतात, कुठे, कुठे पार्टी करतात, आणि कसे संरक्षण करतात, यांची चर्चा झाली. तक्रार देणाऱ्याचे नाव प्रशासनातील काही अधिकारी वाळू तस्करांना लगेच सांगतात. कारवाई करण्याऐवजी काय करतात, याचे किस्से ग्रामस्थांनी सांगितले.
पुणे विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना लगेच निवेदन देण्याचा निर्णय झाला. नदीच्या पात्रातील एक हजार ब्रास वाळूचा उपसा करण्यात आला असून, महसूल प्रशासन वाळू तस्करांना मदत करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यापुढे वाळू तस्कर नदीच्या पात्रात वाळू नेण्यासाठी आला की लगेच त्याचे वाहन पेटवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सरपंच रामदास सूर्यवंशी, माजी सरपंच दादासाहेब सूर्यवंशी, शंकर सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, तुकाराम सूर्यवंशी, शहाजी सूर्यवंशी, बापूराव सूर्यवंशी, विश्वंभर सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, मारूती सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.