पाण्याअभावी वाळू लागल्या बागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:40 PM2019-03-31T23:40:32+5:302019-03-31T23:40:37+5:30
सांगली : शाळा, क्लासेस, अभ्यास यात गुरफटून पडलेल्या मुलांना सुटीचा आनंद लुटण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे शहरातली बागा. महापालिकेनेही यंदा ...
सांगली : शाळा, क्लासेस, अभ्यास यात गुरफटून पडलेल्या मुलांना सुटीचा आनंद लुटण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे शहरातली बागा. महापालिकेनेही यंदा ग्रीन स्पेसची संकल्पना राबवित जवळपास २१ ठिकाणी छोट्या बागा विकसित केल्या. पण आता नव्या बागांसह जुन्या बागांमध्येही पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने बागांची देखभाल, दुरुस्तीही रामभरोसे आहे. यंदाच्या सुटीत मुलांना या बागांत खेळण्या-बागडण्याचा आनंद घेता येणार नाही, असेच चित्र आहे.
महापालिकेच्या ३० बागा आहेत. महापालिकेच्यावतीने गेल्या दोन वर्षात २१ खुल्या भूखंडांवर ग्रीन स्पेस विकसित करण्यात आले. त्यासाठी साडेचार कोटीचा निधी खर्च झाला आहे. यापैकी १६ ग्रीन स्पेस पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. उपनगरांत ही ग्रीन स्पेस (छोट्या बागा) उभारल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला. नव्या वर्षात प्रत्येक प्रभागात एक बाग, याप्रमाणे नवीन २० बागा उभारण्याचे नियोजनही उद्यान विभागाने केले आहे. एकीकडे बागांची संख्या वाढत असताना, सध्या अस्तित्वातील बागा वाचविण्यासाठीही धावपळ उडाली आहे.
सध्या अनेक बागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. सरस्वतीनगर, सावरकर कॉलनी, चाणक्यपुरीसह दोन ते तीन बागांमधील कूपनलिका ठणठणीत कोरड्या पडल्या आहेत. महावीर उद्यानातील कूपनलिकाही बंद आहे. काळ्या खणीतून त्यासाठी पाईपलाईन टाकली आहे. पण खणीतील पाणीही सिंचनासाठी योग्य नाही. ग्रीन स्पेसची जबाबदारी आज तरी ठेकेदाराकडे आहे. तिथेही कूपनलिकांची सोय केली आहे. काही कूपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे ठेकेदारालाही बागा जिवंत ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
उद्यान विभागाकडे केवळ एकच टँकर उपलब्ध आहे. या टँकरमधून बागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यात पुतळे, रस्त्याकडेची झाडे यांच्यासह नगरसेवकांनी मागणी केल्यास टँकर द्यावा लागतो. त्यामुळे एक टँकर उद्यान विभागाला पुरेसा नाही. त्यात बागांसाठी पिण्याचे पाणी वापरता येत नाही. त्यामुळे उद्यान विभागाला स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी लागते. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा परिसरात बाग उभारण्याची मागणी केली जात आहे. पण तिथे पाण्याची व्यवस्था नाही. त्यात बागकामासह इतर कामासाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. गेल्या दीड वर्षापासून ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरवठा झालेला नाही. त्याच्या निविदेची फाईल वरिष्ठांच्या टेबलावर धूळ खात पडली आहे. अशा अनेक अडचणीतून सध्या उद्यान विभाग मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे हिरवाई फुलविण्याचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र आहे.