Crime News: सांगली पोलीस मुख्यालयातील चंदनचोरी, रॅकेट उघड; तपासाबाबत गुप्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 04:30 PM2022-07-20T16:30:54+5:302022-07-20T16:33:04+5:30
चोरट्यांसह संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
सांगली : पोलीस मुख्यालयाच्या पश्चिमेस असलेल्या ट्रॅफिक पार्कमधील चंदनाची झाडे तोडून चोरणाऱ्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याचे वृत्त आहे. मात्र, या चोरट्यांसह संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. बुधवारी ते उघड होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था पाहणाऱ्या पोलीस मुख्यालयातच चोरीचा प्रकार घडला होता. पोलीस मुख्यालयात पश्चिम बाजूला पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक यांच्या निवासस्थानाला लागूनच ट्रॅफिक पार्क आहे. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी आत प्रवेश करत चंदनाची झाडे कापली व त्यांचा बुंधा चोरून नेला होता. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते.
विश्रामबाग पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक याचा तपास करत होते. परिसरातील सीसीटीव्ही पाहणी करून पोलीस त्या चोरट्यांपर्यंत पोहोचले आहेत. तांत्रिक तपासाअभावी त्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. शिवाय केवळ पोलीस मुख्यालयातीलच चोरी उघडकीस आणण्याचा नव्हे तर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालवला आहे. आज, बुधवारी या प्रकरणाचा छडा लागणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतरच माहिती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.