सांगली महापालिकेच्या उद्यानातून चंदनाच्या झाडाची चोरी
By शीतल पाटील | Published: October 4, 2022 07:22 PM2022-10-04T19:22:33+5:302022-10-04T19:23:05+5:30
काही दिवसांपुर्वी पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थान परिसरातूनच चंदनाच्या झाडांची झाली होती चोरी
सांगली : महापालिकेच्या महावीर उद्यानातून चोरट्याने चंदनाच्या झाडाची चोरी केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सकाळी मार्निंग वाॅकसाठी आलेल्या नागरिकांना चोरीची बाब निदर्शनास आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद नव्हती.
अधिक माहिती अशी, की चोरी, शहरात चंदनाच्या झाडाची चोरी करणारी टोळी सक्रीय आहे. काही दिवसांपुर्वी पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थान परिसरातूनच चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. या चोरीचा छडा लावत पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केले होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री महावीर उद्यानात चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची घटना समोर आली. मध्यरात्री चार ते पाच चोरट्यांनी उद्यानात प्रवेश केला. तेथील चंदनाच्या झाडाची इलेक्ट्रीक कटरसहायाने तोडणी केली. त्यानंतर पुढे मोकळ्या जागेत झाडाचे तुकडे केले आणि बुंदे घेवून चोरटे पसार झाले.
सकाळी फिरायला आलेल्या लोकांना झाड तोडल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी काही वस्तूही पडल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, विलास मुंढे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अंमलदार बिरोबा नरळे, सागर लवटे यांच्यासह पथक दाखल झाले होते. त्यांनी पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात नव्हती.
दुसऱ्या प्रयत्नात यश
महावीर उद्यानातील चंदनाच्या झाडाची चोरी करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. झाड तोडताना आवाज झाल्याने सुरक्षा रक्षक बाहेर आले. त्यावेळी चोरट्यांनी पळ काढला होता. सोमवारी मध्यरात्री मात्र चोरट्यांनी झाडाच्या फांद्या दोरीने बांधून बुंदा चोरी करून नेण्यात चोरटे यशस्वी झाले.