आष्टा येथील गुंड संदीप गायकवाड तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:01+5:302020-12-30T04:37:01+5:30
इस्लामपूर : आष्टा (ता. वाळवा) येथील गुन्हेगार संदीप सुरेश गायकवाड (३६. रा. खोत मळा, आष्टा) याला दीड वर्षाकरिता ...
इस्लामपूर : आष्टा (ता. वाळवा) येथील गुन्हेगार संदीप सुरेश गायकवाड (३६. रा. खोत मळा, आष्टा) याला दीड वर्षाकरिता सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
संदीप गायकवाड याच्याविरोधात आष्टा पोलिसांत गर्दी, मारामारी, घातक हत्याराने दुखापत करणे, दारू पिऊन दहशत माजविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वेळोवेळी अटकेची कारवाई तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनदेखील त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. गायकवाड वास्तव्यास असलेल्या भागात त्याची दहशत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक तक्रार देत नव्हते. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी इस्लामपूर यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार सोमवार २८ रोजी गायकवाड याला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दीड वर्षाकरिता तडीपार करण्यात आले.