नोबेलच्या यशामध्ये रेठरेहरणाक्षच्या सुपुत्राचे योगदान--संदीप कलेढोणकर यांच्या जिद्दीला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:10 PM2017-10-13T19:10:26+5:302017-10-13T19:13:39+5:30
इस्लामपूर : ‘क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या संशोधनासाठी जॅक्स दुबोशे, जोआखीम फ्रँक व रिचर्ड हेंडरसन या तिघा शास्त्रज्ञांच्या चमूला यावर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ‘क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या संशोधनासाठी जॅक्स दुबोशे, जोआखीम फ्रँक व रिचर्ड हेंडरसन या तिघा शास्त्रज्ञांच्या चमूला यावर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील जोआखीम फ्रँक यांना संशोधनात सहकार्य करणाºया १४ जणांच्या गटात वाळवा तालुक्याच्या रेठरेहरणाक्षमधील डॉ. संदीप कलेढोणकर या शास्त्रज्ञाचा समावेश होता. नोबेलच्या यशामध्ये तालुक्याच्या शास्त्रज्ञ सुपुत्राचा हातभार लागल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
स्वीडन येथील स्टॉकहोममध्ये १२ डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात डॉ. जोआखीम फ्रँक यांच्यासमवेत डॉ. संदीप कलेढोणकर उपस्थित राहणार आहेत. जागतिक कीर्तीचा नोबेल पुरस्कार मिळविणाºया संशोधकांच्या चमूत शास्त्रज्ञ म्हणून कार्य करण्याचा बहुमान रेठरेहरणाक्षसारख्या खेड्यातील तरुणाला लाभला.
विषाणू किंवा तत्सम सूक्ष्म अशा जैव रासायनिक पदार्थांचे आहे त्या स्थितीत निरीक्षण करण्याचे तंत्र विकसित झाल्यावर बायोकेमिस्ट्री क्षेत्रात क्रांती घडली. आता त्यापुढे जाऊन जिवंत स्थितीतील जैव रासायनिक रेणूंचे निरीक्षण रंगीत व त्रिमिती अवस्थेतही करणे शक्य झाले आहे. जैव रासायनिक प्रक्रिया बिघडल्यावरच शारीरिक व्याधी जडतात. मानवी शरीरातील व्याधींच्या या कारणांचा अभ्यास करणे, जैव रासायनिक रेणूंचे निरीक्षण करणे, तसेच विषाणूंचा हल्ला नेमका कसा होतो याचे प्रत्यक्ष चित्रण क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी या तंत्राने पाहणे शक्य झाले आहे.
या तंत्रामुळे भविष्यात कर्करोग, अल्झायमर यासारख्या व्याधींवर औषध निर्मिती करणेही सुलभ होणार आहे. उणे १५0 अंश सेल्सिअस तापमानाला रेणू गोठवून त्याचे निरीक्षण करण्याचे तंत्र विकसित करण्याचे अद्भूत कार्य जोआखीम फ्रँक व त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांनी केले आहे. हे संशोधन मानवाच्या सुखावह शरीरस्वास्थ्यासाठी मोठे वरदान ठरणार आहे. त्यांच्या या संशोधन कार्यात डॉ. संदीप कलेढोणकर यांनी योगदान दिले आहे.
डॉ. संदीप हे प्रा. लक्ष्मण कलेढोणकर यांचे पुत्र होत. त्यांचे शालेय शिक्षण इस्लामपूरच्या आदर्श बालक मंदिरात व पलूसच्या नवोदय विद्यालयात झाले. पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी मिळविल्यावर अमेरिकेतील ओक्लाहोम विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली. ते सध्या न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात शास्त्रज्ञ आहेत.
रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील शास्त्रज्ञ डॉ. संदीप कलेढोणकर (डावीकडील) नोबेल विजेते शास्त्रज्ञ जोआखीम फ्रँक यांच्यासमवेत.