संदीप पाटील यांची इस्लामपूरच्या राजकारणात एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:58+5:302021-09-13T04:24:58+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राजारामबापू पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर एकनिष्ठतेने राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली पालिकेत ...
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राजारामबापू पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर एकनिष्ठतेने राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली पालिकेत तीस वर्षांहून अधिक काळ एकहाती सत्ता काबीज करणारे विजय पाटील यांची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचे पुत्र संदीप पाटील सरसावले आहेत. त्यांनी विजय पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवित आगामी पालिका निवडणुकीत एन्ट्री करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांना जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे ताकद देणार आहेत
इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात एम. डी. पवार आणि विजय पाटील यांनी आपल्या कारकिर्दीचा इतिहास घडविला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील यांनी पालिकेत तीस वर्षांहून अधिक काळ सत्ता गाजवली. विजय पाटील यांनी विरोधकांना संभाळत शहराचा विकास साधला. सर्व गटांशी मिळते जुळते घेत राजकारणात इस्लामपूरच्या सीमा ओलांडल्या नाहीत. त्यामुळेच जयंत पाटील यांनी इस्लामपूरच्या बाबतील निर्णय विजय पाटील यांना विचारूनच घेतले. जयंत पाटील यांच्या राजकीय दरबारात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या निधनानंतर इसलमपूर शहर राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
विजय पाटील यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे, जयंत पाटील यांनी त्यांच्याच घरातील विश्वास पाटील यांना राजारामबापू पाटील कारखाना उपाध्यक्षपद शहाजी पाटील यांना पालिकेच्या राजकरणासह शहर राष्ट्रवादीची जबाबदारी दिली. विजय पाटील यांचे निधन झाले; त्यानंतर शहाजी पाटील यांनी पालिकेतील विजयभाऊ गट सांभाळून विजय पाटील यांचे पुत्र संदीप पाटील यांना साथ देत आहेत. आगामी पालिका निवडणुकीत प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली संदीप पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.
चौकट
कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन विजय पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले. प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर, शहरात कीटकनाशकाची फवारणी; तर नर्ले येथील इसलमपूर अर्बन बँकेच्या नूतन इमारतीचे उदघाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात येत आहे.