सुुशोभिकरणातील सँड स्टोनचा खडाही घेतला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:00+5:302021-04-21T04:26:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम अनेकवेळा रखडले होते. या सुशोभिकरणात वापरण्यात येणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम अनेकवेळा रखडले होते. या सुशोभिकरणात वापरण्यात येणाऱ्या सँड स्टोनमधील साधा खडाही मी घेतलेला नाही. ज्यांनी माझ्यावर हा आरोप केला आहे, त्यांनी माझ्या नावासह त्याचा पुरावा जनतेसमोर मांडावा. आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडू, असा पलटवार नगरसेवक खंडेराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
जाधव म्हणाले, आरोप करणाऱ्यांनी त्यांच्या बुडाखाली काय आहे, याचा स्फाेट केला तर ते पालिकेत येणार नाहीत. एखाद्याबद्दल अफवा पसरविणे, दिशाभूल करणे, बदनामी करणे असे उद्योग बंद करावेत. ज्यांनी माझे नाव न घेता सँड स्टोन नेल्याचा आरोप केला आहे, त्यांनी ज्या ठेकेदारांनी स्टोन बसविल्यात त्यांनाच विचारावे. तेव्हा दूध का दूध, पानी का पानी होईल. सुशोभिकरण करताना अनेकवेळा हे काम रखडले होते. ठेकेदाराला वेळेवर बिले मिळाली नव्हती. त्यातच काहीनी त्याला त्रास दिला. याची जबाबदारी घेऊन मी स्वत: ठेकेदाराला संबंधित काम करण्यास भाग पाडले आणि सुशोभिकरणाचे काम पूर्णत्वास नेले. प्रामाणिक काम करूनही मागेपुढे विचार न करता पुराव्याविना जे आरोप करतात, त्यांनी जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.