क्रिकेट वादातून सांगलीत हाणामारी
By Admin | Published: February 20, 2017 11:57 PM2017-02-20T23:57:33+5:302017-02-20T23:57:33+5:30
दोघे जखमी : असीफ बावा-टोल्या पोतदार गटात जुंपली; आठ जणांना अटक
सांगली : क्रिकेट सामना बरोबरीत सोडविल्याच्या वादातून खणभागातील असीफ बावा व पंचमुखी मारुती रस्त्यावरील टोल्या ऊर्फ प्रफुल्ल पोतदार यांच्या दोन गटांत जोरदार मारामारी झाली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली. एकमेकांच्या घरावर दगडफेक करून, घरात घुसून तलवारीचा धाक दाखविण्यात आला. याप्रकरणी दोन्ही गटांच्या ३७ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. बावा गटाच्या आठजणांना अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये सलमान असीफ बावा (वय २९), हंजल असीफ बावा (२२), अब्बुबक्कर हुसेन जमादार (२१), साजीस कबीर मगदूम (२६), नईम सिकंदर पटवेगार (२३), फिरासत फक्रुद्दीन शेख (२०, सर्व रा. मकानदार गल्ली, खणभाग) व अकीब इसाक बाणदार (२६, नगारजी गल्ली, खणभाग, सांगली) यांचा समावेश आहे. रात्री टोल्या पोतदार गटाची पहिली फिर्याद दाखल केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी बावा गटाकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. रात्री दहा वाजता अंतिम सामना असीफ बावा व टोल्या पोतदार यांच्या गटात झाला. पण हा सामना बरोबरीत सोडविला गेला. यातून दोन्ही गटांत वाद झाला होता. हा वाद मिटविण्यात आला होता. तरीही रात्री उशिरा त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला व दोन्ही गट आमने-सामने आले.
टोल्या पोतदार गटाकडून धनंजय अरुण पोतदार (३६, खणभाग कणसे गल्ली) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार असीफ बावा यांच्या मुलांसह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. क्रिकेट वादातून बावा यांच्या मुलांनी बेकायदा जमाव जमवून घराजवळ येऊन मारहाण केली, घरावर दगडफेक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
बावा गटाकडून अर्षद दिलावर पेटकर (२३, रा. अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, सांगली) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार टोल्या ऊर्फ प्रफुल्ल पोतदार, दिलावर जमादार, अवधुत शिंदे, अस्लम शेख-कबुतरवाला, पप्पू जोगळेकर, अण्णा पाटील, अभिजित चव्हाण व २० अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील कोणालाही अद्याप अटक केलेली नाही.
क्रिकेटचा सामना संपल्यानंतर असीफ बावा यांना सोडण्यासाठी अर्षद पेटकर खणभागात गेला होता. त्यावेळी संशयित तिथे आले व त्यांनी अर्षदला गाडीवर बसण्यास सांगितले. पण त्याने नकार दिला. त्यामुळे संशयितांनी त्यास बॅटने हातावर तसेच पायावर मारहाण केली. तसेच बावा यांच्या घरात घुसून तलवारीचा धाक दाखविला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दोन्ही गटात जोरदार मारामारी झाल्याचे समजताच शहर पोलिसांची पळापळ झाली. खणभाग, पंचमुखी मारुती रस्त्यावर पहाटेपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)