सांगलीत मनसैनिकांचा राडा, बाजरपेठेत पाठलाग करत परप्रांतीयांना बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 11:27 AM2017-10-11T11:27:20+5:302017-10-11T11:31:20+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा भूमीपुत्रांचा मुद्दा उचलला आहे. सांगलीतील कुपवाड एमआयडीसी येथे मनसे कार्यकर्त्यांनी भूमीपुत्रांचा मुद्दा उचलत परप्रांतीयांना मारहाण केली.
सांगली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा भूमीपुत्रांचा मुद्दा उचलला आहे. सांगलीतील कुपवाड एमआयडीसी येथे मनसे कार्यकर्त्यांनी भूमीपुत्रांचा मुद्दा उचलत परप्रांतीयांना मारहाण केली. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. मनसे कार्यकर्त्यांनी एमआयडीसी परिसरातील कुपवाड बजारपेठेत राडा घालत परप्रांतीयांना मारहाण केली.
मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप करत, परप्रांतीयांना हकलून लावण्यासाठी हे आंदोलन केल्याचा दावा तानाजी सावंत यांनी केला.
कुपवाड एमआयडीसी येथे अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये जवळपास 20 ते 25 हजार परप्रांतीय कामगार काम करतात. या कामगारांना विरोध करण्यासाठी मनसेने आंदोलन केलं. खरेदीसाठी कामगार कुपवाड बाजारात आले असता मनसे कार्यकर्त्यांनी पाठलाग करत त्यांना बेदम मारहाण केली. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुपवाड शहर प्रमुख विनय पाटील यांचाही समावेश आहे. तर मनसेचे पदाधिकारी आणि इतर तरुणांना पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेऊन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
#WATCH MNS workers beat up non-Maharashtrians in Sangli's
— ANI (@ANI) October 11, 2017
MIDC Kupwad demanding preference to local youth for jobs in the area's industries pic.twitter.com/xtMRAHWbSD
परप्रांतीयांमुळे शहरातील गुन्हेगारी वाढल्याचा आरोपही मनसेने केला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड येथील महापालिका क्षेत्रात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होण्यामागे परप्रांतीय असल्याचा दावा मनसे करत आहे.