सांगलीत अळ्यामिश्रीत, गढुळ पाणीपुरवठा, संताप सोशल मिडियाद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:34 PM2018-01-20T16:34:18+5:302018-01-20T16:41:54+5:30
सांगली शहरातील रामनगर, गावभाग, पाटणे प्लॉट, गवळी गल्ली, खणभाग व शहराच्या पश्चिम परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अळ्यामिश्रीत व गढुळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबतचा संताप सोशल मिडियाद्वारे परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
सांगली : शहरातील रामनगर, गावभाग, पाटणे प्लॉट, गवळी गल्ली, खणभाग व शहराच्या पश्चिम परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अळ्यामिश्रीत व गढुळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबतचा संताप सोशल मिडियाद्वारे परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
शनिवारी सांगलीतील दूषित पाणीपुरवठ्याबद्दलचे संदेश सोशल मिडियावरून व्हायरल झाले. संबंधित भागातील अशा पाण्याची छायाचित्रेही फिरत होती. गढुळ व अळ्यामिश्रीत पाणीपुरवठ्याचा प्रकार वारंवार तिन्ही शहरांमध्ये आढळून येतो. अनेकदा याविषयी संबंधित भागातील नागरिकांना आंदोलनेही केली आहेत. महापालिका नगरसेवकांनीही भर सभेत अशा गढुळ पाण्याच्या बाटल्या आणून संताप व्यक्त केला होता.
गेल्या सहा दिवसांपासून शहराच्या पश्चिम भागात आळ्या व मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. महापालिकेच्या यंत्रणेमार्फत वारंवार पाणीशुद्धिकरणाचे दाखले दिले जातात, प्रत्यक्षात होणारा पाणीपुरवठा हा शुद्ध नसल्याचे दिसून आले.
महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाईपलाईन व ड्रेनेजच्या पाईपलाईन एकाच मार्गावरून जाताना दिसतात. त्यामुळे बऱ्यांचदा जलवाहिन्यांना गळती लागून त्याद्वारे सांडपाणी मिसळल्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. गॅस्ट्रोच्या साथीने अनेकांचा बळीही गेला होता. त्यामुळे नागरिकांना नेहमीच महापालिकेच्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल शंका वाटत असते.
पाणीपुरवठ्या यंत्रणा सुधारण्यासाठी अनेक आंदोलने झाली, मात्र सुधारणा फारशी झालेली नाही. महापालिकेची याबाबतची उदासिनता नेहमीच स्पष्ट झाली आहे. महापालिका क्षेत्रात सध्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण यात अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमार्फत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाबद्दल संतप्त प्रतीक्रिया उमटत आहेत.