अंगणवाडीसेविकांचा सांगलीत संताप-- थाळीनाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:08 AM2017-09-17T00:08:10+5:302017-09-17T00:10:54+5:30
सांगली : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने शनिवारी सांगलीत थाळीनाद आंदोलनातून संताप व्यक्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने शनिवारी सांगलीत थाळीनाद आंदोलनातून संताप व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री जर महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे ऐकत नसतील तर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
कृती समितीच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर कार्याध्यक्षा मंगला सराफ आणि आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्त्रबुध्दे, शौकत पठाण यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून संप सुरु केला आहे. मानधनवाढीबाबत सरकारकडून चालढकलपणा सुरु आहे. सेविका आणि मदतनीसांच्या मानधनवाढीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, या समितीने सेविकांना अडीच हजार, तर मदतनीसांना अठराशे रुपयांची मानधन वाढ सुचविली आहे. हा प्रस्ताव अद्याप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि महिला बालकल्याण मंत्री मुंडे यांच्याकडे याबाबत सातत्याने बैठका होत आहेत. परंतु त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नाही. मानधनवाढीबाबत मुख्यमंत्री फडणवीस महिला बालकल्याण मंत्र्यांचे ऐकत नसतील, तर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कार्याध्यक्षा सराफ यांनी केली.
कृती समितीने बेमुदत संपाचा निर्णय कायम ठेवला असून, जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाड्या बंद आहेत. कोणत्याही शासकीय बैठकांना उपस्थित रहायचे नाही व मासिक अहवालही द्यायचा नाही, असा निर्धार करण्यात आला आहे. एक एप्रिलला दिलेल्या संपाच्या नोटिसीची दखल घेतली नाही.
२० जुलैला मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. २५ जुलैला आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला; मात्र सरकारने अद्याप दखल घेतली नाही. गणपती उत्सवसारख्या महत्त्वाच्या सणालासुध्दा मानधन मिळाले नाही. अंगणवाडी कर्मचारी यांना तुटपुंज्या मानधनावर राबवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत.
मानधन वाढीचा निर्णय झाल्याशिवाय माघार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष आनंदी भोसले, उपाध्यक्षा नादिरा नदाफ, अरुणा झगडे, कमल साळुंखे, रेखा साळुंखे, निलप्रभा लोंढे, मधुमती मोरे, वंदना सकळे, अलका विभुते, अलका माने, विजया जाधव, शुभांगी कांबळे, मंगलताई पाटील, शालन मोहिरे, विद्या कांबळे, संगीता तवरे, सुरेखा लोहार, मिनाज मुलाणी, सुहासिनी पवार, जयश्री चंदनशिवे तसेच सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.
कुपोषण वाढल्यास सरकार जबाबदार : मंगला सराफ
अंगणवाडी कर्मचाºयांचा संप सुरु असल्याने पोषण आहार देण्याचे काम बंद आहे. कुपोषित बालकांचा आहारही थांबला आहे. अंगणवाडीच्या किल्ल्या सेविका आणि मदतनीसांना तात्काळ देण्यात याव्यात, असे आदेश महिला बालकल्याणच्या आयुक्तांनी दिले आहेत. मात्र मानधनाचा प्रश्न सुटल्याशिवाय किल्ल्या दिल्या जाणार नाहीत. सरकारकडून अंगणवाडी कर्मचाºयांचा प्रश्न तात्काळ सुटला नाही, तर कुपोषण वाढण्याची भीती आहे. कुपोषण वाढल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशाराही महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कृती समितीच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ यांनी दिला.