सांगलीत रविवारपासून दशरात्रोत्सवास सुरुवात
By admin | Published: December 31, 2015 11:32 PM2015-12-31T23:32:27+5:302016-01-01T00:01:49+5:30
विविध कार्यक्रम : मराठा सेवा संघाचे आयोजन
सांगली : मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ३ जानेवारीपासून जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील आणि जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा हेमलता देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्यावतीने दरवर्षी जिजाऊ जयंतीनिमित्त दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तीन जानेवारीपासून उत्सवास सुरुवात होणार आहे. रविवार, दि. ३ जानेवारीला जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. ४ जानेवारीला बचत गट प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. ५ जानेवारीला ‘नवउद्योजकांसाठी व्यवसायातील संधी’ या विषयावर समाजातील उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत. बुधवार, दि. ६ जानेवारीला गंगाधर बनबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी केडर कॅँपचे आयोजन केले आहे. ७ जानेवारीला ‘शेती : उद्योग की पारंपरिक व्यवसाय?’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.
शनिवार, दि. ९ जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. यात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य’ या विषयावर पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा गटात वक्तृत्व स्पर्धा होईल. खुल्या गटासाठी ‘राजमाता जिजाऊ- एक प्रेरणा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. रविवार, दि. १० जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मराठा वधू-वर परिचय मेळावा, तर दुपारी चार वाजता महिलांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, दि. १२ जानेवारीला जिजाऊ जयंतीदिनी दशरात्रोत्सव कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास वंदना शेखर गायकवाड, तेजस्विनी पाटील, जयश्री पाटील उपस्थित राहणार आहेत.
हे कार्यक्रम सिव्हिल हॉस्पिटलच्यामागील मराठा सेवा संघाच्या भवनात होणार आहे. यावेळी डॉ. संजय पाटील, संजय देसाई, तेजस्विनी सूर्यवंशी, विजयराव भोसले, महेश घारगे, विद्या भोसले, शुभांगी साळुंखे, प्रणिता पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)