सांगलीत पूरस्थिती जैसे थेच!

By Admin | Published: July 14, 2016 12:30 AM2016-07-14T00:30:36+5:302016-07-14T00:30:36+5:30

पावसाची विश्रांती : शामरावनगर पाण्याखाली; कर्नाळ रस्त्यावर पाणी, इंचाइंचाने पाण्यात घट; ४८ कुटुंबांंना हलविले

Sangalyat floods were like! | सांगलीत पूरस्थिती जैसे थेच!

सांगलीत पूरस्थिती जैसे थेच!

googlenewsNext

सांगली : सलग पाच दिवसांच्या मुसळधार पावसानंतर बुधवारी सांगली शहर व परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पूरस्थिती कायम आहे. अजूनही सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील घरांमध्ये शिरलेले पाणी कमी झालेले नाही. सकाळी कर्नाळ रस्ता पाण्याखाली गेला होता. आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी इंचाइंचाने कमी होत आहे. सायंकाळपर्यंत अर्धा फूट पाणी कमी झाले होते.
पाच दिवस पडलेल्या पावसाने सांगलीची दुर्दशा झाली आहे. चौकाचौकात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असला तरी, या चौकांमध्ये मातीचा गाळ तसाच होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. सकाळी सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी ३४.९ फुटांपर्यंत गेली होती. दिवसभरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने इंचाइंचाने पाणी कमी होत होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत नदीची पातळी ३४.५ फुटांवर स्थिरावली होती. रात्रीच्या सुमारास पाणीपातळी वाढल्याने सकाळी कर्नाळ रस्त्यावर गुडघाभर पाणी आले होते. त्यामुळे सांगली-पलूस मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जुना बुधगाव रस्त्यावरही पाणी साचले होते.
पावसाने दम टाकला असला तरी सांगली शहरातील पूरस्थिती अजूनही कायम आहे. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, काकानगर, दत्तनगर परिसरातील घरे सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली होती. या परिसरातील १९ कुटुंबांतील ५४ जणांचे शाळा क्रमांक एकमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. शामरावनगर परिसरालाही तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागातील पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू होता. महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण उपस्थित होते. शामरावनगरात अजूनही शेकडो घरांच्या दारात गुडघाभर पाणी साचलेले आहे. ड्रेनेज चरी काढलेला परिसर चिखलमय झालेला होता. कुपवाडमधील आनंदनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील २९ कुटुंबीयांना महापालिकेने शाळा क्रमांक ३३ मध्ये हलविले आहे.

Web Title: Sangalyat floods were like!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.