सांगलीत लिंगायत महामोर्चाचे विराट दर्शन, धर्ममान्यतेसाठी समाज एकवटला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 05:59 PM2017-12-03T17:59:16+5:302017-12-03T17:59:29+5:30

सांगली : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सांगलीत लिंगायत समाजाने विराट मोर्चा काढला.

Sangalyat Lingayat Mahamarchar's Virat Darshan, a society for religious reorganization | सांगलीत लिंगायत महामोर्चाचे विराट दर्शन, धर्ममान्यतेसाठी समाज एकवटला

सांगलीत लिंगायत महामोर्चाचे विराट दर्शन, धर्ममान्यतेसाठी समाज एकवटला

Next

सांगली : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सांगलीत लिंगायत समाजाने विराट मोर्चा काढला. या महामोर्चात कर्नाटक, कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील लिंगायत बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. एक लिंगायत... कोटी लिंगायतच्या घोषणांनी सांगली शहर दुमदुमले होते. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

डोईवर भगवे फेटे, टोप्या आणि हाती भगवे ध्वज घेऊन लिंगायत समाजबांधव सांगलीतील विश्रामबाग चौकात एकवटले. सकाळपासूनच विश्रामबाग चौकात लिंगायत समाजबांधवांचे जथेच्या जथे जिल्ह्याच्या कानाकोप-यातून येत होते. विश्रामबाग चौकात बसव पीठ तयार करण्यात आले होते. सकाळी साडेदहा वाजल्यापासून विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचे बसव पीठावर आगमन झाले. प. पू. डॉ. बसवलिंग पट्टदेवरू, प. पू. कोरणेश्वर, रुद्रपशुपती कोळेकर महाराज, चन्नबसवानंद स्वामीजी, सद्गुरु बसवप्रभू स्वामीजी यांच्या उपस्थितीत भगवा ध्वज फडकवून महामोर्चाला प्रारंभ झाला.
यावेळी लिंगायत धर्म, स्वतंत्र धर्म, आम्ही लिंगायत, धर्म लिंगायत अशा घोषणांनी विश्रामबाग चौक दणाणून गेला होता. संपूर्ण विश्रामबाग चौक, सांगली-मिरज रस्ता खचाखच भरला होता. डॉ. शिवानंद शिवाचार्य यांनी समाजबांधवांना आशीर्वचन दिले. त्यानंतर विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात आला.

मोर्चाच्या मार्गावर दुतर्फा स्वयंसेवकांनी साखळी केली होती. मुस्लिम समाज, बहुजन मुक्ती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांनी रस्त्यावर नाष्टा, पाण्याचे स्टॉल लावले होते. समन्वय समितीच्यावतीनेही नाष्टा व पाण्याची व्यवस्था केली होती. दुपारी दोन वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तिथे शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिका-यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता झाली.

मोर्चेक-यांच्या मागण्या
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी, लिंगायतधर्मीयांना धार्मिक अल्पसंख्याक वर्गामध्ये समाविष्ट करावे, राष्ट्रीय व राज्यपातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, २०२१ मध्ये होणा-या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र नोंद होण्यासाठी सरकारने लोकसंख्या पारपत्रामध्ये विशिष्ट स्वरुपात नोंदीची व्यवस्था करावी, लिंगायत धर्माच्या मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्याला मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी शासनाने स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी.

लिंगायत धर्मावर राज्यकर्त्यांकडून अन्याय : डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात लिंगायत धर्माची जनगणनेमध्ये स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करण्यात आल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. लिंगायत हा एक अवैदिक धर्म असून त्यातील आचरण पद्धती, तात्त्विकी बैठक, परंपरा या हिंदू धर्मापेक्षा पूर्णत: भिन्न आहेत. त्यामुळे लिंगायत हा स्वतंत्र धर्म सिद्ध होतो. स्वतंत्र भारतामध्ये लिंगायत धर्माला संवैधानिक दर्जा न देऊन केंद्र सरकारने समाजबांधवावर अन्याय केला आहे. अल्पसंख्याक असणारा लिंगायत समुदाय शासकीय लाभापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे लिंगायत धर्माला संवैधानिक दर्जा देण्यासाठी भारत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी आशीर्वचनात केली.

मुंबईत दहा लाखांचा मोर्चा काढणार
लिंगायत समाजाच्यावतीने विविध मागण्यासाठी नांदेड, लातूर आणि आता सांगलीत महामोर्चा झाला. येत्या २८ जानेवारी रोजी यवतमाळ येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, सोलापूर या जिल्ह्यातही मोर्चे काढण्यात येणार आहे. मुंबईत दहा लाख समाजबांधवांचा मोर्चा काढून शासनाला जाग आणणार असल्याचे अविनाश भोसीकर यांनी सांगितले.

Web Title: Sangalyat Lingayat Mahamarchar's Virat Darshan, a society for religious reorganization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली