सांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, धीरज सूर्यवंशी उपमहापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:26 PM2018-08-20T13:26:17+5:302018-08-20T13:52:24+5:30
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर म्हणून संगीता खोत यांची सोमवारी झालेल्या विशेष सभेत निवड झाली. अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली.
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर म्हणून संगीता खोत यांची सोमवारी झालेल्या विशेष सभेत निवड झाली. अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे
सकाळी साडे अकरा वाजता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहून महापौर निवडीच्या विशेष सभेचे कामकाज सुरु झाले.
धीरज सूर्यवंशी उपमहापौर
विशेष सभा सुरू होण्यापूर्वी गोव्याला गेलेल्या नगरसेवकांचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने निषेध केला. महानगरपालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर भाजपच्या पहिल्याच महापौरपदाचा मान संगीता खोत यांना आणि उपहमहापौरपदाचा मान धीरज सूर्यवंशी यांना मिळाला. अटलजींच्या निधनामुळे साध्या पध्दतीने ही निवडप्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
नव्या सभागृहात भाजपचे ४१ नगरसेवक असून अपक्ष गजानन मगदूम यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ३५ नगरसेवक आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे सर्व नगरसेवक गोव्याला सहलीसाठी गेले होते. सर्व पक्षांनी नगरसेवकांना व्हीप लागू केले होते.
भाजपकडून महापौरपदासाठी संगीता खोत आणि उपमहापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसकडून वर्षा अमर निंबाळकर यांनी महापौरपदासाठी तर स्वाती पारधी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते.
स्वाती मदने यांनी महापौरपदासाठी दाखल केलेला अर्ज सकाळी मागे घेतल्यानंतर संगीता खोत आणि वर्षा निंबाळकर यांच्यासाठी मतदान सुरु झाले. त्यात संगीता खोत ४२ मतांनी विजयी झाल्या. उपमहापौरपदासाठीही धुरज सूर्यवंशी यांना ४२ आणि स्वाती पारधी यांना ३५ मते मिळाली. विजय घाडगे तटस्थ राहिले.