मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला , स्वच्छता मुंबईमुळे फत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 07:30 PM2019-08-25T19:30:01+5:302019-08-25T19:31:08+5:30
मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला गेला. त्यामुळेच सांगली महापालिकेला स्वच्छतेचे शिवधनुष्य पेलता आले.
सांगली : महापूर ओसरल्यानंतर सांगलीच्या स्वच्छतेत मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांसह अधिकाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली. तब्बल आठवडाभर ४५० कर्मचाऱ्यांचे पथक अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह स्वच्छतेच्या कामात सहभागी झाले होते. मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला गेला. त्यामुळेच सांगली महापालिकेला स्वच्छतेचे शिवधनुष्य पेलता आले.
महापुरानंतर खºयाअर्थाने स्वच्छतेचे मोठे आव्हान सांगली महापालिकेसमोर होते. अशा संकटसमयी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह राज्यातील नगरपालिका सांगलीकरांच्या मदतीला धावून आल्या. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सफाई कामगार व अधिकाºयांचे पथक सांगलीला पाठविले. या पथकाचे नेतृत्व कार्यकारी अभियंता सुनील सरदार व स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी यांच्याकडे सोपविण्यात आले. मुंबई महापालिकेचे ४०० कर्मचारी व ५० वाहनचालक, १२ डंपर, ७ सक्शन व जेटिंग व्हॅन, २ जेसीबी, ३ स्मॉल अर्थमुव्हर यंत्रे असा सर्व ताफा मुंबईतून १२ आॅगस्ट रोजी रात्रीतच सांगलीमध्ये दाखल झाला.
सांगलीचे आयुक्त नितीन कापडणीस, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी या पथकाचे स्वागत करून पूरबाधित क्षेत्राची माहिती दिली. १३ आॅगस्ट रोजी मुंबईच्या अधिकाºयांनी पूरबाधित क्षेत्राची पाहणी करून प्राथमिक आराखडा तयार केला. त्यानुसार ५० कर्मचाºयांची सात पथके तयार करून एकाच वेळी सात ठिकाणी स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. या पथकाने पहिल्या दिवशी २०० टन कचरा उचलला. सात सक्शन व्हॅनच्या मदतीने शहरामध्ये साचलेले पाणी, तुंबलेली ड्रेनेज व सेप्टीक टँक, मलनि:सारण वाहिन्या स्वच्छ करुन ७०० ते ७५० टन मैलायुक्त पाणी कचरा डेपोकडे रवाना केले.
पाणी ओसरल्या भागात चिखल व कचरा रस्त्यावर पडला होता. हा परिसर स्वच्छ करणे आव्हानात्मक बाब होती. पण ४५० कर्मचाºयांच्या मदतीने हे आव्हानही त्यांनी लिलया पेलले. १५ आॅगस्ट रोजी साधारणत: ७० टक्के परिसर स्वच्छ झाला होता. १६ रोजी पूरग्रस्त नागरिक व व्यावसायिक घरी, दुकानांकडे परतू लागले. परिणामी घरातील व दुकानातील साहित्य, फर्निचर, कपडे, पुस्तके, सडलेले खाद्यपदार्थ आदीमुळे शहरामध्ये कच-याचे ढीग व दुर्गंधी पसरली होती. ही परिस्थिती पाहून मुंबईच्या पथकाचा मुक्काम आणखी दोन ते तीन दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला.
दि. १७ ते १९ आॅगस्टदरम्यान शहरातील बाजारपेठा, रहिवासी विभाग व बफरझोनमध्ये स्वच्छता केली. या पथकाने जवळपास साडेतीन हजार टन कचरा उचलून तो डेपोवर पोहोचविला होता. या कर्मचा-यांच्या राहण्याची, भोजन व नाष्ट्याची जबाबदारी शाखा अभियंता वैभव वाघमारे व त्यांच्या सहका-यांनी पार पाडली. अखेर सांगलीच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देऊन मुंबई महापालिकेचे पथक परतले.