सांगली : अर्भक मृत्यूप्रकरणी ११ लाखाची नुकसानभरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 04:42 PM2018-11-10T16:42:21+5:302018-11-10T16:44:11+5:30
तासगाव येथील शासकीय प्रसुती केंद्राच्या निष्काळजीपणामुळे ३१ डिसेंबर २00९ रोजी झालेल्या अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या एका लढ्यास ९ वर्षानंतर न्याय मिळाला. मानवाधिकार आयोगाने गतवर्षी यासंदर्भात दिलेल्या निकालाप्रमाणे राज्य शासनाने मिरज वैद्यकीय महाविद्यालयास संबंधित मृत अर्भकाच्या मातेस ११ लाख ८५ हजार रुपये अदा करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे रकमेचा धनादेश देण्यात आला.
सांगली : तासगाव येथील शासकीय प्रसुती केंद्राच्या निष्काळजीपणामुळे ३१ डिसेंबर २00९ रोजी झालेल्या अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या एका लढ्यास ९ वर्षानंतर न्याय मिळाला. मानवाधिकार आयोगाने गतवर्षी यासंदर्भात दिलेल्या निकालाप्रमाणे राज्य शासनाने मिरज वैद्यकीय महाविद्यालयास संबंधित मृत अर्भकाच्या मातेस ११ लाख ८५ हजार रुपये अदा करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे रकमेचा धनादेश देण्यात आला.
अनुश्री सुरेश कोळीगुड्डे या महिलेची नैसर्गिक प्रसुती डिसेंबर २00९ मध्ये तासगाव येथील कस्तुरबा प्रसुती केंद्रात झाली होती. जन्मलेल्या बाळाचे आरोग्य चांगले होते, तरीही जन्मानंतर द्यावे लागणाऱ्या उपचारांबद्दल हलगर्जीपणा केल्यामुळे या अर्भकाचा मृत्यू ३१ डिसेंबर २00९ मध्ये झाला.
या घटनेने कोळीगुड्डे कुटुंबियांना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. त्यांनी याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. संबंधित तत्कालिन वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व सुरक्षा रक्षक यांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याबाबतची मागणी या कुटुंबाने मानवाधिकार आयोगाकडे केली होती. येथील मास फॉर सिटिझन या सामाजिक संघटनेने याबाबतचा पाठपुरावा केला.
आयोगाकडे हे प्रकरण गेल्यानंतर रितसर चौकशी करण्यात आले. चौकशीचे अहवाल आयोगापुढे सादर झाले. आयोगाने या सर्व कागदपत्रांची व आलेल्या पुराव्यांची शहानिशा करून २ जानेवारी २0१७ रोजी यासंदर्भातील आदेश देत संबंधित महिलेस १0 लाख रुपये नुकसान भरपाईचा निर्णय घेतला.
या आदेशामध्ये भरपाईची ही रक्कम आदेशापासून तीन महिन्याच्या आत द्यावी तसेच विलंब केल्यास १२.५0 टक्के प्रतिवर्षी व्याजाची रक्कम दंड म्हणून द्यावेत, असाही उल्लेख करण्यात आला होता. शासनाने याप्रकरणी दिरंगाई करीत १ वर्ष घालविले. शेवटी २४ सप्टेंबर २0१८ रोजी राज्य शासनाने परिपत्रक काढून मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वीय प्रपंजी खात्यातून ही रक्कम व्याजासह देण्याची सूचना केली.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयाने शासन आदेशाचे पालन करीत नुकताच या महिलेला ११ लाख ८५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी सुरेश कोळीगुड्डे, दिलीप कोळीगुड्डे तसेच आरोग्य विभाग प्रमुख सुरेश भोसले, मास फॉर सिटिझन संघटनेचे लालासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
प्रदीर्घ काळ दिलेल्या या लढ्यास अखेर यश मिळाल्याने कोळीगुड्डे कुटुंबियांना दिलासा मिळाला. आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास विलंब झाल्याने शासनालाही याकामी फटका बसला.
संघटनेचा लढा
याप्रकरणी मास फॉर सिटिझन या संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. संघटनेचे राज्य अध्यक्ष सुरेश भोसले, तासगावचे अमिन मुल्ला, सुभाष माळी, लालासाहेब पाटील, सुरेश भोसले, हनिफ मालगावे, अॅड. मनिष कांबळे, नाना कनवाडकर यांनी याकामी परिश्रम घेतले. संघटनेनेही महिलेला न्याय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.