सांगली : सांगलीत २ आॅक्टोबरला गुरुकुल संगीत महोत्सव ; गायन-वादनाची मैफल रंगणार- मंजुषा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:42 PM2018-09-27T23:42:12+5:302018-09-27T23:47:44+5:30
संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान व स्वरझंकार पुणे यांच्यावतीने दि. २ आॅक्टोबर रोजी गुरूकुल संगीत महोत्सवाचे आयोजन भावे नाट्यमंदिर येथे करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संचालिका व शास्त्रीय गायिका सौ. मंजुषा पाटील यांनी दिली.
सांगली : संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान व स्वरझंकार पुणे यांच्यावतीने दि. २ आॅक्टोबर रोजी गुरूकुल संगीत महोत्सवाचे आयोजन भावे नाट्यमंदिर येथे करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संचालिका व शास्त्रीय गायिका सौ. मंजुषा पाटील यांनी दिली.
सांगलीमध्ये गेली अकरा वर्षे संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत महोत्सव घेतला जात असून, गुरूकुलाच्या माध्यमातून गेली चार वर्षे हा संगीत महोत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर्षी आंतरराष्टÑीय कीर्तीचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा गुरूकुल संगीत विद्यालयाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार होणार आहे.
यावेळी चिन्मय मिशनचे प. पू. स्वामी तेजोमयानंद, प्रसिध्द बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, प. पू. झेंडे महाराज, ज्येष्ठ उद्योगपती काकासाहेब चितळे, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संगीत महोत्सवाची सुरूवात ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका मंजुषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. त्यानंतर राकेश चौरासिया यांच्या बहारदार बासरीवादनाचा कार्यक्रम होणार आहे. राकेश चौरासिया हे पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य व पुतणे असून, ते आपल्या घराण्याचा बासरीवादनाचा वारसा समर्थपणे पुढे चालवित आहेत. मंजुषा पाटील यांनी संगीताचार्य द. वि. काणेबुवा यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर डॉ. विकास कशाळकर आणि आता पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडे आजही त्यांचे गायन शिक्षण सुरू आहे. त्यांनी शास्त्रीय संगीताचा वारसा पुढे जपण्यासाठी आपले गुरू द. वि. काणेबुवा यांच्या नावाने गुरूकुल संगीत विद्यालयाची स्थापना केली आहे.
या कार्यक्रमात तबलासाथ पंडित विजय घाटे करणार आहेत. ते तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य असून, त्यांनी अनेक नामवंत कीर्तीच्या गायकांना तबलासाथ केली आहे. संवादिनीसाथ तन्मय देवचके करणार असून कार्यक्रमाचे निवेदन सौ. प्रतिमा सप्रे करणार आहेत. तरी संगीत रसिकांसाठी मेजवानी असलेल्या या संगीत महोत्सवाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोविंद बेडेकर यांनी केले आहे.