सांगली : सीसीटीव्हीसाठी चार मंडळाकडून २५ हजाराची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 02:09 PM2018-10-16T14:09:10+5:302018-10-16T14:11:06+5:30
सांगली शहराच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाला फाटा देऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनास सांगलीतील चार गणेश मंडळासह नवरात्र उत्सव मंडळाने प्रतिसाद देत २५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे सुपुर्द केली.
सांगली : शहराच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाला फाटा देऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनास सांगलीतील चार गणेश मंडळासह नवरात्र उत्सव मंडळाने प्रतिसाद देत २५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे सुपुर्द केली.
यंदाही ध्वनिक्षेपकाच्या दणदणाटाने होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. ध्वनिक्षेपकावर खर्च होणारे पैसे विधायक कामांसाठी खर्च करावेत, अशी पोलीस यंत्रणेची भूमिका होती. सध्या सांगली, मिरज व कुपवाड शहरात ८० सीसीटीव्ही कॅमेरे काम करीत आहेत.
या सीसी टीव्हीच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. अद्यापही काही भागात सीसी टीव्ही नाहीत. त्यासाठी मंडळांनी पुढाकार घेऊन सीसी टीव्ही बसविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास मंडळांचा प्रतिसाद मिळाला आहे.
सांगलीतील कलानगरच्या जयमहाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाने तीन हजार, ओमगणेश कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळाने दहा हजार, खणभागातील विजय चौक नवरात्र मंडळाने ५ हजार, गोल्डन क्लब गणेश मंडळाने ७ हजार असे एकूण २५ हजारांची रक्कम पोलिसप्रमुखांकडे सुपुर्द केली.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे, एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, गुंडाविरोधी पथकाचे संतोष डोके, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते.