सांगली : आरवडेतील ५० जणांना विषबाधा, प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 02:52 PM2018-05-12T14:52:50+5:302018-05-12T14:52:50+5:30
आरवडे (ता. तासगाव) येथील ५० जणांना तासगाव येथे एका लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. तात्काळ या सर्वांना आरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथील ५० जणांना तासगाव येथे एका लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. तात्काळ या सर्वांना आरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
आरवडे येथील ग्रामस्थ एका लग्नसमारंभासाठी तासगावला गेले होते. तासगावमधील एका खासगी मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. विवाहानंतर जेवण करून सर्वजण गावी परतले. रात्री यापैकी अनेकांना त्रास जाणवू लागला.
अचानक जुलाब व उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे अनेकांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली, तर काहीजण शुक्रवारी सकाळी आरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी कमी पडू लागल्याने मांजर्डे, डोर्ली, गौरगाव येथील वैद्यकीय पथक बोलावण्यात आले.
पितांबर चव्हाण, प्रशांत बबन पाटील, अशोक शंकर चव्हाण, प्रतीक बाबासाहेब चव्हाण, बाळासाहेब विनायक चव्हाण, सुनीता भानुदास कदम, वेदांत विजय कदम, शुभम पांडुरंग चव्हाण, जयसिंग चव्हाण, स्वप्नील महादेव चव्हाण, श्रीमंत धनंजय पाटील, सुनीता वसंत पाटील, आदित्य सुनीलराव चव्हाण, सुशांत जनार्धन खंडागळे, रमेश कृष्णा शिंदे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
अन्य रूग्णांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतले.वैद्यकीय अधिकारी डी. बी. मस्के, एल. एस. माने, बी. ए. माळी, एस. एस. इंगवले, रंजना पवार यांच्यासह पथकाने उपचार केले.