सांगली : तुंग, कसबे डिग्रजच्या ७ सावकारांना अटक पैसे वसुलीसाठी दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:46 PM2019-02-01T22:46:57+5:302019-02-01T22:47:32+5:30
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तुंग (ता. मिरज) येथील संजय टकुगडे यांना घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या कसबे डिग्रज व तुंगमधील सात सावकारांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी
सांगली : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तुंग (ता. मिरज) येथील संजय टकुगडे यांना घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या कसबे डिग्रज व तुंगमधील सात सावकारांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील अजूनही तीन संशयित पसार आहेत.
अटक केलेल्यांमध्ये संभाजी नामदेव पाटील (वय ४६, रा. कवठेपिरान, सध्या डी-मार्टमागे, शंभरफुटी रस्ता, सांगली), बाळू रघुनाथ भानुसे (४३), विजय महादेव मदने (३२), तानाजी पांडुरंग सुतार (३६, सर्व रा. तुंग), दत्तात्रय यशवंत चव्हाण (५५), प्रमोद ऊर्फ राहुल शंकर डांगे (३९) व सुजीत शिवाजी कुंभार (३०, कसबे डिग्रज, ता. मिरज) यांचा समावेश आहे. विकास भोसले, सागर वडगावे (कवठेपिरान), सुरेश किसन सुतार (रा. कसबेडिग्रज) अशी पसार असलेल्या तिघांची नावे आहेत.
काही वर्षापूर्वी संजय टकुगडे यांच्या आई आजारी होत्या. तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती.
यासाठी त्यांनी संशयितांकडून अगदी पंधरा हजारांपासून ते सहा लाखांपर्यंतची रक्कम प्रतिमहिना दहा टक्के व्याजदराने व्याजाने घेतली होती. या पैशाची त्यांनी व्याजासह परतफेड केली आहे. तरीही अजून पैसे देणे लागतोस, असे म्हणून वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. दोन दिवसांपूर्वी संशयित संभाजी पाटील याने टकुगडे यांना घरात घुसून वसुलीसाठी दमदाटी केली होती. सर्वच संशयित वसुलीसाठी त्रास देऊ लागल्याने टकुगडे हतबल झाले होते. त्यामुळे त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार संशयित दहाजणांवर सावकार अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता.
पोलीस कोठडी
गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच अटकेच्या भीतीने संशयित पसार झाले होते. यातील सातजणांना गुरुवारी रात्री अटक करण्यात यश आले. शुक्रवारी दुपारी त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने सर्वांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.