सांगली: ग्रामपंचायतींकडून दलित वस्ती विकास निधीत अफरातफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 16:11 IST2022-10-31T16:11:16+5:302022-10-31T16:11:43+5:30
काही ग्रामपंचायती शासनाच्या आदेशांचे पालन करत नाहीत. ही रक्कम अनुत्पादक बाबींवर खर्च करतात.

सांगली: ग्रामपंचायतींकडून दलित वस्ती विकास निधीत अफरातफर
सांगली : ग्रामपंचायतींनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या १५ टक्के रक्कम मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्च करावी असे धोरणात्मक आदेश आहेत; पण तसा खर्च केला जात नाही. त्याविरोधात व्यापक लढा उभारणार असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिली.
प्रा. वायदंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काही ग्रामपंचायती शासनाच्या आदेशांचे पालन करत नाहीत. ही रक्कम अनुत्पादक बाबींवर खर्च करतात. मागासवर्गीयांना विश्वासात न घेता दबावतंत्राचा वापर करून निधी अन्यत्र वापरतात. या संदर्भात वारंवार तक्रारी येतात, पण कारवाई होत नाही. भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी करतात. याविरोधात पुरोगामी परिषद राज्यव्यापी चळवळ सुरू करणार आहे.
ते म्हणाले, या निधीमध्ये अफरातफर करणाऱ्या ग्रामपंचायतींवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेकडून कडक कारवाईचा आग्रह धरणार आहोत. ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत.