सांगली पुन्हा पुराच्या दिशेने, कृष्णा नदी पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 09:04 PM2020-08-16T21:04:06+5:302020-08-16T21:09:19+5:30
कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी २८ फुटापर्यंत गेली होती. शहरात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून नदीचे पाणी कर्नाळ रोडपर्यंत आले होते.
सांगली : कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी २८ फुटापर्यंत गेली होती. शहरात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून नदीचे पाणी कर्नाळ रोडपर्यंत आले होते.
दरम्यान, महापालिकेने सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट परिसरातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना केल्या आहेत. सायंकाळी सूर्यवंशी प्लॉटमधील दोन कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
खासदार संजयकाका पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सूर्यवंशी प्लॉटला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. धरणातून वाढता विसर्ग व संततधार पावसामुळे रविवारी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी १७ फुटापर्यंत खाली होती. पण शनिवारपासून कोयनेतून विसर्ग सुरू झाला. रविवारी सकाळी सात वाजता आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी २३ फूट होती.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यात पाच फुटाने वाढ होऊन २८ फुटापर्यंत पोहोचली होती. कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून कर्नाळ रोडपर्यंत पाणी पसरले होते. पावसाचा जोर व धरणातील विसर्ग पाहता महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे.
शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये ३० ते ३२ फुटाला पाणी शिरते. त्यामुळे महापालिकेने सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या. सकाळी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी चिंतामणी कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशी प्लॉटमध्ये ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सूचना दिल्या.
सायंकाळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट दिली. सूर्यवंशी प्लॉटमधील दोन कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणील माने, भलचिम कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला.
शहरातील नागरिकांना पुन्हा पुराची धास्ती वाटत आहे. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील अनेक कुटुंबांनी स्थलांतराची मानसिक तयारी केली आहे. या कुटुंबांनी घरातील साहित्याची आवराआवरही सुरू केली होती.
सांगलीच्या पूरपट्ट्यातून कुटुंबांचे स्थलांतर सुरू झाले आहे. महापालिकेचे कर्मचारी त्यांना मदत करीत आहेत. नागरिकांनी पाणी पातळी वाढण्याची वाट न पाहता वेळीच घराबाहेर पडावे. महापालिकेने स्थलांतरित नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था केली आहे. घराबाहेर न पडणाºया नागरिकांची घरे पोलिसांच्या मदतीने सक्तीने सील केली जातील.
- नितीन कापडणीस, आयुक्त