सांगली : मिरजेच्या नगरसेविकेचा महासभेत दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 01:22 PM2018-03-31T13:22:01+5:302018-03-31T13:22:01+5:30
आयुक्तांनी विकासकामांच्या फाईल्स अडवल्याचा राग व्यक्त करत मिरजेच्या नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी शनिवारी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला.
सांगली : आयुक्तांनी विकासकामांच्या फाईल्स अडवल्याचा राग व्यक्त करत मिरजेच्या नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी शनिवारी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला. महिला सदस्यांनी त्यांच्या हातातील दगड काढून घेतल्याने प्रसंग टळला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगरसेविका कांबळे यांनी प्रलंबित फायलींचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना अन्य महिला सदस्यांनी अडवले. त्यानंतर तीन तास कांबळे यांनी जागेवर उभे राहून आयुक्तांचा निषेध केला.
नंतर सर्व महिला सदस्यांनी पीठासनासमोर ठिय्या मांडला. सदस्यांनीही आयुक्तांवर संताप व्यक्त केला. आयुक्त रवींद्र खेबुडकर सभेला गैरहजर होते. त्यामुळे संतापात भर पडली. आयुक्तांवर महाभियोग चालविण्याची मागणीही सदस्यांनी केली. महापालिकेच्या सर्वच सदस्यांनी आसन सोडून पीठासनासमोर गर्दी केली. त्यामुळे गोंधळ वाढला. आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. महापौर व उपायुक्त सुनील पवार यांना घेराव घालून निर्णय घेण्याची मागणी केली.