Sangli: सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे होणार पेपरलेस, १ जूनपासून ऑनलाईन कामकाज
By संतोष भिसे | Published: May 23, 2023 07:00 PM2023-05-23T19:00:11+5:302023-05-23T19:00:26+5:30
Sangli: सांगली जिल्ह्यातील सर्व म्हणजे ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रे १ जूनपासून पेपरलेस होणार आहेत. केसपेपरपासून सर्व वैद्यकीय कामकाज ऑनलाईन होणार आहे. त्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात मंगळवारी (दि. २३) जिल्हा परिषदेत झाली.
- संतोष भिसे
सांगली : जिल्ह्यातील सर्व म्हणजे ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रे १ जूनपासून पेपरलेस होणार आहेत. केसपेपरपासून सर्व वैद्यकीय कामकाज ऑनलाईन होणार आहे. त्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात मंगळवारी (दि. २३) जिल्हा परिषदेत झाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, साथ रोग अधिकारी डॉ. संतोष पाटील, डॉ. विनायक पाटील आदी उपस्थित होते.
आज पहिल्या दिवशी तासगाव तालुक्यातील सात आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाईल. सध्या केंद्रांमध्ये केसपेपर, तपासणी, औषध योजना व औषध वाटप, आंतररुग्ण, गर्भवती स्त्रिया, लसीकरण आदी सर्व कामकाजाच्या नोंदी ऑफलाईन स्वरुपात होतात. १ जूनपासून त्या ऑनलाईन होतील. त्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
डुडी म्हणाले की, रुग्णाच्या केसपेपरपासून सर्व नोंदी संगणकीय प्रणालीत केल्या जातील. त्यासाठी त्याचा मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक आदी तपशील नोंदवला जाईल. डॉ. माने म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रे ऑनलाईन स्वरुपात परस्परांशी जोडली जातील. त्यामुळे रुग्ण कोणत्याही केंद्रात उपचार घेऊ शकेल. तेथे त्याचा नोंदणी क्रमांक टाकताच यापूर्वीच्या उपचारांची सर्व माहिती तात्काळ मिळेल. या प्रणालीसाठी प्रत्येक आरोग्य केंद्राला चार संगणक देण्यात येत आहेत.
नव्या प्रणालीमुळे दररोजची रुग्णसंख्या, रुग्ण किती वाजता आला आणि किती वाजता उपचार मिळाले?, केंद्रातील औषध साठा, कोणाला किती व कोणती औषधे दिली? आदी सर्व तपशील नोंद होणार आहे. केंद्रांना गावातूनच औषधांसाठीची मागणी नोंदवता येईल. स्मार्ट पीएचसी अंतर्गत रुग्णसेवा अधिक गतिमान व पारदर्शक होण्यासाठी या प्रणालीचा वापर होईल. यामुळे आरोग्य केंद्रे पेपरलेस होणार आहेत.