Sangli- अमणापूर मारहाण प्रकरण: खूनी हल्ला करणाऱ्यास दीड वर्षाचा सश्रम कारावास
By अविनाश कोळी | Published: January 10, 2024 06:55 PM2024-01-10T18:55:25+5:302024-01-10T18:56:13+5:30
शेतातील बांधावरुन भांडण
पलूस : पलूस तालुक्यातील अमणापूर येथील मारहाणप्रकरणी पलूस येथील न्यायालयाने एकास दोषी ठरवत दीड वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पलूस तालुक्यातील अमणापूर येथील अरुण पांडुरंग लोहार हे त्यांचा मुलगा प्रशांत याच्यासोबत शेतात सरबांधावरील कट सरळ करण्याकरिता गेले होते. बांधाच्या हद्दीप्रमाणे काठ्या रोऊन माती ओढून कुंपण तयार करत असताना आरोपी मुरलीधर जालिंदर मुळीक (वय ३५, रा. अमणापूर) हा हातात तलवार घेऊन तेथे आला. ‘तुम्ही येथे माती ओढून घ्यायची नाही’, असे म्हणून भांडण काढले. फिर्यादी व त्याच्या मुलाच्या हातावर तलवारीने वार करून जखमी केले. शिवीगाळ करून तुम्हाला जिवंत ठेवत नाही, अशी धमकी देऊन निघून गेला होता.
त्यांनतर फिर्यादी यांनी पलूस पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याप्रमाणे पलूस पोलिस ठाण्यात १ जानेवारी २०१३ रोजी कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याचा निकाल पलूस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. खान यांनी दिला.
आरोपी मुरलीधर मुळीक याला १ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व कलम ३२४ साठी ६ महिने सश्रम कारावास व ५ हजार दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्यात पलूस पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सरकारी वकील सुवर्णा भोसले, सुवर्णा पाटील, कोर्ट पेरवी अंमलदर मनीषा पाटील यांनी योगदान दिले.