पुरामुळे संपर्क तुटतोय तरी सांगलीला संपर्क क्रांती मिळेना, मध्य रेल्वेबाबत नाराजी 

By अविनाश कोळी | Published: July 29, 2024 03:33 PM2024-07-29T15:33:21+5:302024-07-29T15:34:01+5:30

कुडची, उगारखुर्दला दक्षिण पश्चिम रेल्वे पावली

Sangli and Kirloskarwadi did not stop the Sampark Kranti in the flood situation of Sangli | पुरामुळे संपर्क तुटतोय तरी सांगलीला संपर्क क्रांती मिळेना, मध्य रेल्वेबाबत नाराजी 

पुरामुळे संपर्क तुटतोय तरी सांगलीला संपर्क क्रांती मिळेना, मध्य रेल्वेबाबत नाराजी 

सांगली : पूरस्थितीमुळे रस्ते पाण्याखाली जातात. अशावेळी रेल्वेचा एकमेव आधार असताे. कर्नाटकातील पूरस्थितीत दक्षिण पश्चिम रेल्वेने पूरस्थितीचे गांभीर्य ओळखून कुडची व उगारखुर्द या लहान स्थानकांवरही संपर्क क्रांतीचा थांबा दिला; मात्र मागणी करूनही सांगलीच्या पूरस्थितीत सांगली व किर्लोस्करवाडीला संपर्क क्रांतीचा थांबा मिळाला नाही. त्यामुळे मध्य रेल्वेबाबत प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा पंचगंगा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक पूल, रस्ते पाण्याखाली आहेत. एसटीच्या ८२५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. अशावेळी रेल्वेचे एकमेव संपर्क साधन आहे.

कर्नाटकातही अशाच पूरपरिस्थितीत जेव्हा बसचे मार्ग बंद झाले तेव्हा प्रवाशांच्या मदतीला रेल्वे धावली. संकटकाळात हुबळीच्या दक्षिण पश्चिम रेल्वेने कुडची व उगारखुर्द या लहान स्थानकावर संपर्क क्रांती एक्स्प्रेसला थांबा देऊन लोकांची मदत केली. याउलट सांगलीतील पूरस्थितीची कल्पना देत येथील प्रवासी संघटनांनी रेल्वेकडे मागणी करूनही संपर्क क्रांतीला सांगली व किर्लोस्करवाडी या दोन महत्त्वाच्या स्थानकावरही थांबा दिला नाही.

केंद्रीय पथके आली, पण रेल्वे दूर

सांगलीकरांच्या मदतीला लष्कर तसेच एन. डी. आर. एफची पथके दाखल झाली. राष्ट्रीय आपत्ती म्हणून मदतकार्य सुरू झाले असताना मध्य रेल्वेने सांगलीतील प्रवाशांच्या मागणीकडे कानाडोळा केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

उगार, कुडचीला तब्बल दहा गाड्या

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने आधी संपर्क क्रांतीला २४ ते २७ जुलैपर्यंत कुडची व उगार या लहान स्थानकावर थांबा दिला होता. त्यानंतर पूर परिस्थिती वाढल्यामुळे ४ ऑगस्टपर्यंत या दोन्ही स्थानकावरील संपर्क क्रांतीचा थांबा वाढविला. इतर दहा गाड्यांनासुद्धा या दोन्ही स्थानकांवर थांबा दिलेला आहे. अशा स्थितीत सांगलीवर मात्र अन्याय होत असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.

सांगली व किर्लोस्करवाडी या स्थानकाबाबत कायमच मध्य रेल्वे दुजाभाव करते. कर्नाटकमध्ये पूरस्थितीत रेल्वे मदतीला धावते व सांगलीत मागणी करूनही धावत नाही. संपर्क क्रांतीच नव्हे तर सर्वच गाड्यांबाबत अशी अन्यायी भूमिका वारंवार दिसून येते. - सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच

Web Title: Sangli and Kirloskarwadi did not stop the Sampark Kranti in the flood situation of Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.