सांगली व कोल्हापूर महापालिका हद्दीतील एलबीटी असेसमेंटविरुद्ध लढाई सुरू ठेवणार : समीर शहा, शासनाने स्थगिती कायम ठेवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:40 PM2017-12-20T13:40:58+5:302017-12-20T13:48:11+5:30
सांगली व कोल्हापूर महापालिका हद्दीतील एलबीटी वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असली तरी, ही स्थगिती कायमस्वरुपी द्यावी, व्यापाऱ्यांची असेसमेंट रद्द करावी, यासाठी लढा सुरूच ठेवणार, असे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.
सांगली : सांगली व कोल्हापूर महापालिका हद्दीतील एलबीटी वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असली तरी, ही स्थगिती कायमस्वरुपी द्यावी, व्यापाऱ्यांची असेसमेंट रद्द करावी, यासाठी लढा सुरूच ठेवणार, असे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.
शहा म्हणाले, गेली दोन वर्षे एलबीटीविरोधात व्यापारी एकता असोसिएशनने संघर्ष केला आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही व्यापाऱ्यांची असेसमेंट रद्द करावीत, सीए पॅनेल रद्द करावे, यासाठी वारंवार पाठपुरावा केला.
सत्ताधाऱ्यांचे नेते मदनभाऊ पाटील यांनी दिलेला शब्द पाळावा इतकीच व्यापाऱ्यांची अपेक्षा होती; पण याची कोणतीही दखल पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही. उलट व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. एकतर्फी निर्धारण करून लाखो रुपयांच्या नोटिसा देऊन व्यापाऱ्यांत दहशत निर्माण केली.
आ. सुधीर गाडगीळ यांनीही सुरुवातीला फारसे लक्ष घातले नव्हते, पण शेखर इनामदार यांनी मध्यस्थी करून आ. गाडगीळ व संघटनेची बैठक घडविली. यावेळी व्यापाऱ्यांची छळवणूक, सीए पॅनेलचा घोटाळा, चुकीच्या असेसमेंटचे पुरावेच दिले.
दोन दिवसांपूर्वी आ. गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगलीतील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एलबीटी वसुली व कार्यवाहीला स्थगितीचे आदेश दिले आहे.
ही स्थगिती कायमस्वरुपी रहावी, यासाठी पाठपुरावा करणार आहोत. अभय योजनेतील असेसमेंट रद्द कराव्यात, सीए पॅनेल रद्द करावेत, यासाठी लढा सुरूच राहिल.यावेळी सुरेश पटेल, मुकेश चावला, सोनेश बाफना, सुदर्शन माने, धीरेन शहा उपस्थित होते.